। पालघर । प्रतिनिधी ।
मीरारोडच्या काशीगाव येथे एका शाळेत शिकणार्या अल्पवयीन मुलीचा शाळेच्या बाहेर पाठलाग करून तिला त्रास दिल्याप्रकरणी तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुजान लुकमान साह (22) असे या आरोपीचे नाव आहे.
काशिगाव येथे गुरुवारी (दि.22) दुपारी एक वाजता शाळा सुटल्यानंतर 13 वर्षीय पीडित विद्यार्थीनी तिच्या मैत्रिणीनं सोबत घरी जात होती. शाळेच्या गेट बाहेर एका अनोळखी मुलाने पीडीतेला एक चिट्टी दिली होती. त्यात एक मोबाईल नंबर लिहीला होता म्हणून पीडितेने ती चिड्डी ही फाडून टाकली. तसेच, आरोपी हा शाळेतील इतरही मुलींचा पाठलाग करुन त्यांना त्रास देत होता. यामुळे तिने घाबरुन हा प्रकार शाळेतील शिक्षकांना तसेच मुख्याध्यापिकांना सांगितला. तसेच, यावेळी आरोपी तरूण पीडितेकडे पाहून हातवारे करीत असल्याचे शिक्षकांच्या निदर्शनास आले. यावरून शाळेच्या शिक्षकांनी याची माहिती काशीगाव पोलीस ठाण्यात देत त्या आरोपी तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करून सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय साठे हे करत आहेत.