अनधिकृत बांधकाम करणार्‍यांचे धाबे दणाणले

श्रीवर्धन नगरपरिषदेची तोडक कारवाई

। श्रीवर्धन । वार्ताहर ।

श्रीवर्धन शहरातील चौकर पाखाडी परिसरामध्ये पुणे येथील एका धनदांडग्याने जागा खरेदी केली होती. या व्यक्तीने या जागेमध्ये नगरपरिषदेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता आरसीसीचे अनधिकृत जोते बांधले होते. हे अनधिकृत बांधकाम काढून टाकावे, अशा प्रकारची नोटीस श्रीवर्धन नगर परिषदेने संबंधित बांधकाम करणार्‍या व्यक्तीला बजावली होती. मात्र, संबंधित व्यक्तीने नाताळच्या सुट्टींचा फायदा घेऊन या ठिकाणी पुढील बांधकाम करण्यासाठी सेंट्रिंग ठोकले. यावर नगरपरिषदेने तोडक कारवाई करत उभे करण्यात आलेले सेंट्रींग तसेच जोते जमीनदोस्त केले आहे.

श्रीवर्धन नगरपरिषद हद्दीमध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यासाठी नगरपरिषदेकडून पूर्वपरवानगी घ्यावी लागते. त्याचप्रमाणे नगर रचना विभागाकडून देखील ना हरकत दाखला घ्यावा लागतो. मात्र, अनधिकृत बांधकाम करणारा अमित औरंगाबादकर याने जवळजवळ 3 हजार स्क्वेअर फुट बांधकाम त्या ठिकाणी केल्याचे नगरपरिषदेच्या निदर्शनास आले होते. त्या ठिकाणी अमित औरंगाबादकर हे पर्यटकांसाठी हॉटेल बांधत असल्याचे निदर्शनास आल्याकारणाने तसेच, नोटीस बजावल्यानंतर देखील कोणत्याही प्रकारे उत्तर न दिल्यामुळे श्रीवर्धन नगर परिषदेने या अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई केली आहे.

श्रीवर्धन नगरपरिषद हद्दीत असे प्रकार पुन्हा घडु नयेत यासाठी नगरपरिषदेने कडक पावले उचलल्याचे मुख्याधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले आहे. यावेळी, श्रीवर्धन नगरपरिषदेने जेसीबी लावून उभे करण्यात आलेले सेंट्रींग तसेच जोते जमीनदोस्त केले आहे. या कारवाईमुळे श्रीवर्धन शहरामध्ये अनधिकृत बांधकाम करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. श्रीवर्धन नगर परिषदेचे मुख्याधिकारी विराज लबडे यांनी ही कारवाई अत्यंत कार्य तत्परतेने केल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. अशाचप्रकारे श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर गावामध्ये पुणे येथील अनेक धनदांडग्या व्यक्तींनी सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करुन अनेक अनधिकृत बांधकामे उभी केली आहेत. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा कर बुडत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.

श्रीवर्धन नगरपरिषद हद्दीत अशा प्रकारे कोणीही व्यक्ती अनधिकृत बांधकाम करण्याचा प्रयत्न करीत असल्यास त्या व्यक्तीवर फौजदारीची कारवाई करण्यात येईल. तसेच, अनधिकृत बांधकाम आढळल्यास त्यावर तोडक कारवाई करण्यात येईल.

– विराज लबडे, मुख्याधिकारी तथा प्रशासक,
श्रीवर्धन नगरपरिषद

Exit mobile version