| चिरनेर | प्रतिनिधी |
नवी मुंबईचे वाहतूक पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक विठ्ठल कुबडे यांच्या निर्देशाने उरण परिसर व एन एच 4-बी या महामार्गालगत व मुख्य रस्त्यावर पार्क होणार्या अवजड वाहनांवर आळा घालण्यासाठी व त्यातूनच अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी नवीन उपक्रमाद्वारे विशेष मोहीम राबविण्यात आली होती.
यादरम्यान सीएफएस व एमटी यार्ड यांच्या बाहेर पार्किंग होणार्या अवजड कंटेनर व मुख्य रस्त्यावर पार्किंग करण्यात येणार्या वाहनांवर 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाहतुकीस अडथळा करणार्या वाहनांवर 363 कारवाया करण्यात आल्या आहेत. याशिवाय सतत वाहनांची वर्दळ असलेल्या महामार्गांवर व गोदाम परिसरातील रोडवर कोणत्याही प्रकारे अवजड वाहने पार्किंग होणार नाहीत, याची खबरदारी वाहनचालकांनी घ्यावी. सर्व वाहने नेमण्यात आलेल्या अधिकृत पार्किंगमध्ये उभी करावीत. महामार्ग अथवा गोदामांच्या रोडवर कोणतेही वाहन उभे करण्यात आलेले निर्दशनास आल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल दहिफळे वाहनचालकांना केले आहे.