महिला व तरुणींकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दलालाला अटक
| पनवेल | वार्ताहर |
गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने शुक्रवारी (दि.20) रात्री पनवेलमधील करंजाडे भागात सापळा रचत गरीब व गरजू महिला व तरुणींकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या एका दलालाला अटक केली. वेजद अल्ली खान ऊर्फ राजू मंडल (29) असे आरोपीचे नाव असून या छाप्यात पोलिसांनी तीन महिला व एक बांग्लादेशी अल्पवयीन मुलगी अशा चार पीडितांची सुटका केली आहे. पोलिसांनी आता या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर दोन आरोपींचा शोध सुरू केला आहे.
आरोपी वेजद अल्ली खान हा वेश्यागमनासाठी मुली पुरवत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती.त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे व त्यांच्या पथकाने एका बनावट ग्राहकाच्या माध्यमातून वेजद खानला संपर्क साधत त्याच्याकडे वेश्यागमनासाठी चार मुलींची मागणी केली. त्यानुसार वेजदने चार महिला करंजाडे येथे घेऊन येणार असल्याचे तसेच त्यांचा मोबदला 40 हजार रुपये होणार असल्याचे सांगितले. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने शुक्रवारी रात्री करंजाडे सेक्टर तीन भागात सापळा रचत ही कारवाई केली. तसेच, आरोपीने वेश्यागमनासाठी आणलेल्या चारही महिला व मुलींची सुटका केली.
यावेळी पोलिसांनी पीडितांची चौकशी केली असता वेजद खान व मोतीन हे दोघे गरिबीचा फायदा घेत पीडितांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच, ग्राहकांकडून घेण्यात येणाऱ्या रकमेतून काही रक्कम त्यांना देऊन उर्वरित रक्कम तो स्वत: घेत असल्याचे देखील पीडितांनी यावेळी सांगितले. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने वेजद खान व त्याचा साथीदार मोतीन तसेच बांगलादेशातून 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला घेऊन येणारी महिला शायना या तिघांविरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात पीटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत वेजदला अटक केली. या कारवाईत एका अल्पवयीन बांगलादेशी मुलीची सुटका केली असून या अल्पवयीन मुलीला शायना नावाच्या महिलेने आठ दिवसांपूर्वीच बांगलादेशातून आणल्याचे व तिला मोतीन या दलालाच्या माध्यमातून वेश्याव्यवसायात गुंतवल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी मोतीन व शायना या दोघांचा शोध सुरू केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.