| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मुरूड पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस नाईक किशोर बठारे यांनी रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन चालकांविरोधात विशेष कारवाई मोहीम राबवली. यावेळी शहरातील मुख्य बाजारपेठ, आझाद चौक तसेच गर्दीच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या आणि वाहतुकीत अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान अनेक वाहनांवर ई-चलानद्वारे ऑनलाईन दंड आकारण्यात आला असून, कारवाई करण्यात आली. वाहतूक नियमांचे पालन करावे, नो-पार्किंग क्षेत्रात वाहने उभी करू नयेत आणि इतर वाहनचालकांना तसेच नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन वाहतूक पोलीस नाईक किशोर बठारे यांनी केले आहे. तसेच,शहरातील वाहतूक शिस्तबद्ध राहावी आणि नागरिकांना विनाअडथळा प्रवास करता यावा, यासाठी अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही नियमितपणे सुरू राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्याकडुन सांगण्यात आले.







