। ठाणे । प्रतिनिधी ।
ज्वेलर्सला सोन्याचे दागिने खरेदी केल्यावर हॉलमार्क दागिने देणे बंधनकारक असते. परंतु, सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क मानांकन शिक्का न मारता सोन्याचे दागिने दिले जातात, अशी तक्रार बीआयएसला प्राप्त झाल्याने सोमवारी (दि.25) कल्याण पश्चिमेतील परेश जेल्वर्सच्या दुकानाची बीआयएस टीमने झाडाझडती घेतली. यावेळी 1,610 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हॉलमार्क मानांकन न केल्याचे आढळून आले. यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र, रिंगा, कडे आदींचा समावेश होता. सोन्याच्या दागिन्यांवर विक्री करताना दिनांक, हॉलमार्क शिक्का असणे गरजेचे आहे. यामध्ये दोन ग्रॅमवरील सर्व सोन्याच्या दागिन्यांचा समावेश होता. याबाबत बीआयएसचे अधिकारी अमन सिंह यांनी प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया देताना ठाणे जिल्ह्यातील सोन्याच्या तीन दुकानांवर कारवाई केली असल्याचे सांगितले.