कमी वजनाच्या 36 मुलांचा जन्म
। ठाणे । प्रतिनिधी ।
गेल्या 11 महिन्यांत एक किलोपेक्षा कमी वजनांच्या 36 मुलांचा जन्म प्रसूतीगृहात झाला आहे. येथील ‘एसएनसीयू’ कक्ष बाळांसाठी देवदूत ठरत आहेत. त्यापैकी बर्याच बाळांचीही तब्येत सुधारली असून बाळ घरी सुखरूप जात आहेत. तसेच, ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसूतीगृहात जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाची विशेष काळजी घेतली जात आहे, असे वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. सुरेश वानखेडे यांनी सांगितले आहे.
प्रसूतीगृहात अत्याधुनिक साधन असून, एखादे बाळ कमी वजनाचे जन्माला आलेच तर त्याच्यासाठी स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट (एसएनसीयू कक्ष) या ठिकाणी ठेवले आहे. आई आणि बाळाला कोणता त्रास होणार नाही यादृष्टीने या कक्षात सर्व सोयी ठेवण्यात आल्या आहेत. एक किलोपेक्षा कमी वजनाचे बाळ व्यवस्थित होऊन घरी जात नाही तोपर्यंत रुग्णालयाच्या ‘एसएनसीयू’मध्ये काळजी घेतली जाते. यामध्ये डॉ. राहुल गुरव, डॉ. शैलेश गोपनपल्लिकर, डॉ. प्रकाश बोरुळकर, वरिष्ठ परिचारिका सारिका शेणेकर, शीतल जठार आदी अथक परिश्रम करत असतात.