आगीच्या घटनांत वाढ; आगीच्या घटनांत वाढ
। ठाणे । प्रतिनिधी ।
भिवंडीतील बेकायदा भंगार गोदामे आता सुस्थितीत नाहीत, अवैध भंगार गोदामांमुळे नेहमी आगी लागण्याच्या घटना घडत असतात. त्याचा फटका येथील लोकवस्तीला देखील बसत आहे. यामुळे अशा घटना थांबविण्यासाठी प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
भिवंडी शहर व परिसरात अनेक भंगार गोदामे बेकायदेशीरपणे सुरू आहेत. त्यांच्याकडे या व्यवसायासाठी कोणतेही प्रमाणपत्र नाही. अवैध भंगार गोदामामुळे दोन दिवसांपूर्वी शहरातील फातमा नगर परिसरात आगीची मोठी घटना घडली होती. शहर आणि परिसरात वारंवार होणार्या अशा घटनांवर अंकुश आणण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भंगार गोदामाला लागून असलेल्या लोकवस्तीमधून होऊ लागली आहे. भिवंडीतील अंजूरफाटा, राहनाळ, पूर्णा, कशेळी, धामणकरनाका, रोशनबाग, कल्याण रोड, नदीनाका, श्रीरंगनगर, आसबीसह शहर व ग्रामीण परिसरात प्रत्येक ठिकाणी बेकायदेशीर भंगाराची गोदामे असून तेथे कोणत्याही प्रकारचा माल ठेऊन विकला जातो. भंगार व्यावसायिक त्यांच्या इच्छेनुसार विविध प्रकारचा माल खरेदी करून विक्री करत असतात. अशा गोदामांमध्ये स्फोटक रसायनांचे ड्रम देखील साठवून ठेवले जातात. त्यामुळे आग लागून जीवीतहानी झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. तसेच, अनेकवेळा भंगार मालाचे व्यापारी चोरीचा माल देखील विकत घेत असतात. त्यामुळे भिवंडी आणि परिसरात भंगाराच्या गोदामातून लाखो रुपयांच्या व्यवहाराची उलाढाल होत असते. मात्र, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नाही. तसेच, त्यांच्या व्यवसाय संबंधी पोलिसांसह कोणत्याही सरकारी कार्यालयात नोंद नाही. मात्र, आग लागल्यानंतर संबंधित सरकारी कार्यालयाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी धाव घेऊन कारवाई करत असतात. त्यानंतर जैसे थे भंगार व्यवसाय सुरुच राहतो.