| नवी मुंबई | प्रतिनिधी |
वडाळा भागात राहणाऱ्या 23 वर्षीय तरुणाने त्याच्या परिचयातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तरुणाने तिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा जबरदस्तीने गर्भपात केल्याचे उघडकीस आले आहे.
हमीद रशीद शेख (23) असे या तरुणाचे नाव असून एपीएमसी पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेतील आरोपी हमीद शेख व पीडित मुलगी हे दोघेही वडाळा भागात राहण्यास आहेत. वर्षभरापासून हमीद शेख याने पीडित मुलीसोबत प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर जून महिन्यामध्ये त्याने त्या मुलीला एपीएमसीतील साई प्रतीक लॉजिंग बोर्डिंगमध्ये तसेच इतर वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केले. त्यामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर शेख याने गत आठवड्यामध्ये तिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा जबरदस्तीने गर्भपात घडवून आणला. या प्रकारामुळे मुलीची तब्येत खालावल्यानंतर कुटुंबीयांनी विचारपूस केली असता तिने घडल्याप्रकाराची माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी वडाळा पोलिस ठाण्यात हमीद शेख याच्याविरोधात तक्रार दाखल केली. हा प्रकार एपीएमसीमध्ये घडला असल्याने वडाळा पोलिसांनी हा गुन्हा एपीएमसी पोलिसांकडे वर्ग केल्यानंतर एपीएमसी पोलिसांनी हमीद शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास एपीएमसी पोलीस करत आहेत.