44 हजार वाहनांवर कारवाई; 45 लाख रुपयांची वसुली
| उरण | वार्ताहर |
वाहतूक विभागाने वर्षभरात नियम मोडणाऱ्या 44,524 वाहनांवर कारवाई केली आहे. याअंतर्गत 45 लाख 24 हजार 700 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. जेएनपीएच्या बेशिस्त अवजड वाहनांमुळे येथील परिसरातील वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. त्यामुळे त्याला आळा घालण्यासाठी वाहतूक विभागाकडून मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येत असते, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी सांगितले.
जेएनपीएच्या अनुषंगाने उरण परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण वाढले आहे. मोठमोठे प्रकल्प निर्माण झाले आहेत. त्यातच उरणच्या पूर्व भागात सीएफएस आणि गोदामे वाढली आहेत. त्यामुळे अवजड वाहनांची वर्दळही मोठ्या प्रमाणात वाढली आहे; मात्र काही बेशिस्त अवजड वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणावर नियमांचे उल्लंघन करण्यात येत आहेत. त्यात लहान वाहनांचादेखील समावेश आहे. त्यामुळे नियम मोडणाऱ्या वाहनांवर वाहतूक विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत असते. त्यानुसार एक जानेवारी ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत जवळपास 44,524 बेशिस्त वाहनांवर विविध गुन्ह्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्हचे 105 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत; तर सर्वाधिक कारवाई मोठ्या वाहनांवर नो पार्किंगसाठी कारवाई करण्यात आली आहे. त्याशिवाय सील्ट बेल्ट, विनाहेल्मेट, वाहन चालविताना मोबाईलचा वापर, ट्रिपल सीट, सिग्नल तोडणे, ओव्हरलोड अशा विविध गुन्ह्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली असून 45 लाख 24 हजार 700 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून जनजागृती नियमांचे पालन करण्याच्या दृष्टिकोनातून वाहतूक विभागाचे उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उरण वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर भटे, सहायक पोलिस निरीक्षक संजय पवार यांच्या माध्यमातून जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले आहेत. कॉलेजमध्ये शालेय विद्यार्थ्यांना, गोदामामधील कामगार, ट्रेलरचालक आदींना घटनास्थळी जाऊन जागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले आहेत. या जनजागृती कार्यक्रमामुळे मागील वर्षीच्या अनुषंगाने या वर्षी अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. 2022 मध्ये 49 अपघात झाले होते. त्यामध्ये 34 जणांचा मृत्यू झाला होता. 2023 मध्ये अपघातांची संख्या कमी होऊन 34 वर आली आहे; तर त्यामध्ये 18 जणांचा मृत्यू झाला असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक संजय पवार यांनी सांगितले.