बांगलादेशींना भारतात वास्तव्यासाठी केली मदत
| पनवेल | प्रतिनिधी |
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने पनवेलमधील करंजाडे येथे केलेल्या कारवाईमध्ये पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. या बांगलादेशी नागरिकांना पनवेलमधील मोहम्मद इस्माईल अमिन्नोदीन येऊलकर (52) याने कर्नाटक राज्यातील ईस्माइल शेख याच्यामार्फत बनावट पासपोर्ट आणि जन्मदाखले बनवून दिल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यानुसार गुन्हे शाखेने ईस्माइल शेख आणि येऊलकर या दोघांना अटक केली आहे. तसेच न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढलेल्या आणखी दोन बांगलादेशी नागरिकांनादेखील भाईंदर येथून अटक केली आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने 5 मे रोजी पनवेलमधील करंजाडे भागातील इमारतीवर छापा मारुन त्याठिकाणी राहणाऱ्या तीन महिला आणि दोन पुरुष अशा पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. पोलिसांनी केलेल्या तपासात या सर्वांनी भारतीय नागरिकत्वाचे आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड तसेच पासपोर्ट बनवून घेतल्याचे आढळून आले होते. सदर बांगलादेशी नागरिकांना मोहम्मद इस्माईल अमिन्नोदीन येऊलकर याने भारतीय कागदपत्र बनवण्याकरिता आणि भारतात वास्तव्य करण्यासाठी मदत केल्याचे तपासात आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी या गुन्ह्यात येऊलकर याला सहआरोपी करुन अटक केली. त्यानंतर पोलिसांनी येऊलकर याची चौकशी केली असता, त्याने कर्नाटक राज्यातील कलबुर्गी येथील ईस्माइल शेख याच्यामार्फत सदर बांगलादेशी नागरिकांचे बनावट पासपोर्ट आणि जन्मदाखले बनवल्याचे सांगितले. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख यांचे पथक कर्नाटक राज्यातील कलबुर्गी येथे पाठविण्यात आले होते. या पथकाने ईस्माईल शब्बिर मिया शेख याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्याने पासपोर्ट तयार करण्यासाठी जन्मदाखले बनवून दिल्याचे कबूल केले. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
त्यानंतर पोलिसांनी पनवेल येथून अटक केलेल्या बांगलादेशी महिलेकडे भारतात राहणाऱ्या तिच्या इतर नातेवाईकांबाबत चौकशी केली असता, तिची आई आणि भाऊ मिरा-भाईंदर येथे वास्तव्यास असल्याचे तिने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी भाईंदर पूर्व भागात राहात असलेला राहुल उर्फ मिकाईल ईस्माईल गाझी आणि त्याची आई सुफियाबेगम ईस्माईल गाझी या दोघांना भाईंदर पूर्व येथील खरीगाव येथून अटक केली. त्या दोघांच्या चौकशीत सुफियाबेगम ईस्माईल गाझी हिच्याविरोधात मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने सन 2012 मध्ये गुन्हा दाखल केल्याचे तसेच न्यायालयाने तिच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेला याबाबत माहिती देण्यात आल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी दिली.
सदरची कारवाई गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे सहायक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सरिता गुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख, अलका पाटील, पोलीस हवालदार अनिल मांडोळे आदींच्या पथकाने केली.