। पनवेल । प्रतिनिधी ।
रेल्वेमध्ये सरकारी नोकरीत लावतो असे सांगून इच्छुक इसमासह त्याच्या आईची फसवणूक करून नोकरीचे आमिष दाखवून जवळपास 19 लाख 42 हजार रुपये वेगवेगळ्या कारणाने उकाळणार्या एका सराईत भामट्यास अखेरीस पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले असून, यापूर्वीसुद्धा त्याने अशाच प्रकारे कित्येक लोकांना फसविल्याचे अधिक तपासात निष्पन्न झाले आहे.
पनवेल शहरात राहणारा एक इसमाला फेसबुकवर नोकरी शोधत असताना फेसबुक जॉब अड्डा येथे रेल्वेत नोकरी लावून देण्याची जाहिरात बघितली. त्यानुसार त्याने आरोपी अक्षय कलंगुटकर याच्याशी संपर्क साधला. त्याने रेल्वेत नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून त्याकरिता मेडिकलसाठी टॅक्सचा फॉर्म भरण्याकरिता फॅमिली डिक्लेरेशन, नॅशनल पेन्शन कर्ता तसेच विविध कारणे दाखवून त्याला तसेच त्याच्या आईकडून त्याचप्रमाणे स्वतःच खोटा बॉस उभा करून त्याने या दोघांकडून विविध कारणे दाखवून आतापर्यंत 19 लाख 42 हजार रुपये त्यांच्याकडून उकळले होते. आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच सदर इसमाने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता वपोनि नितीन ठाकरे व पो.नि. शाकीर पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभय कदम, पोलीस हवालदार धीरज थवई, पोलीस कॉन्स्टेबल अभय मेर्या, पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद घरत, पोलीस हवालदार वैभव शिंदे झोन 2 पनवेल आदींनी तांत्रिक तपास सुरू केला असता तो सीबीडी येथील एका ढाब्यावर दारु पित असल्याचे निष्पन्न झाल्याने या पथकाने जाऊन त्याला तेथून ताब्यात घेतले. अधिक तपासात त्याने अशाच प्रकारे नेरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका व्यक्तीला 17 लाखाला तर रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका व्यक्तीला 75 लाखाला फसवणूक केल्याचे व याबद्दल त्याला अटक झाल्याने तो नुकताच जेलमधून सुटला असताना त्याने अशा प्रकारे पुन्हा एकदा जाहिरात देऊन या दोघांची फसवणूक केली होती. परंतु, पनवेल शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा आरोपी अखेरीस गजाआड झाला आहे. त्याच्या खात्यात जमा होणारे पैसे हे तो नेहमी दारु, बिंगो व जुगारात उडवत असे. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभय कदम करीत आहेत.