डू प्लेसिस पाठोपाठ फरेराची माघार
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
शनिवारपासून इंडियन प्रीमियर लीगला पुन्हा सुरूवात झाली आहे. मात्र, त्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे. मिशेल स्टार्कनंतर आता फाफ डू प्लेसिस आणि डोनोव्हन फरेरा यांनीही उर्वरित आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्यामुळे दिल्लीला प्लेऑफसाठी बराच संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्टार्कनंतर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसने आयपीएलमधून माघार घेतली आहे. डू प्लेसिसने यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला चांगली फलंदाजी केली. मात्र, दुखापतीमुळे तो काही सामने खेळू शकला नाही. त्याने 6 सामन्यांत 128 च्या स्ट्राइक रेटसह 168 धावा केल्या, यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामुळे दिल्लीपुढे आता सलामीचा मोठा प्रश्न पडला आहे. यापूर्वीच जेक फ्रेझर-मॅकगर्कनेही आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्यामुळे सलामीला कोण येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिल्लीला आणखी तीन सामने खेळायचे आहेत, अशा वेळी अभिषेक पोरेलसह करुण नायर किंवा केएल राहुल सलामीला येण्याची शक्यता आहे.
तर, डोनोव्हन फरेराला एका सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळण्याची संधी मिळाली होती. परंतु, त्याला म्हणावा तसा प्रभाव पाडता आला नाही. दिल्लीने जेक फ्रेझर-मॅकगर्कच्या जागी बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला संघात सामील करून घेतले आहे. मात्र, तो भारतात येणार की नाही, याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून त्याला परवानगी मिळाली नसल्याची माहिती आहे.