‘रोहित शर्मा स्टँड’चे जल्लोषात अनावरण; शरद पवार, अजित वाडेकर स्टँडचे उद्घाटन
। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर आता भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्या नावाचे स्टँड दिसणार आहे. त्या स्टँडचे अनावरण 16 मे रोजी करण्यात आले. रोहितने वानखेडे स्टेडियमवर अनेक अविस्मरणीय खेळी केल्या आहेत आणि आता त्याच्या नावाचे स्टँड या ठिकाणी दिसणार आहे, ही त्याच्यासह सर्वांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. रोहितसह मुंबई क्रिकेट असोसिएशन, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ व आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे माजी अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचेही स्टँड दिसणार आहे. त्यासह भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे नावही एका स्टँडला दिले गेले आहे.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट प्रेमी आणि रोहित शर्माच्या चाहत्यांना शुक्रवारी एक अनोखा आणि गौरवाचा क्षण अनुभवायला मिळाला आहे. मुंबई क्रिकेट असो.च्या या निर्णयामुळे वानखेडे स्टेडियमच्या गौरवशाली परंपरेत आणखी एक पर्व सुरू झाले आहे. यापूर्वी सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि दिलीप वेंगसरकर यांसारख्या दिग्गजांच्या नावाने स्टँड्स आहेत आणि आता भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचे नाव देखील या यादीत समाविष्ट झाले आहे. शुक्रवारी रोहित शर्माच्या नावाच्या स्टँडचे अनावरण करण्यात आले. या खास सोहळ्यात रोहितसोबत त्याची पत्नी, आई-वडील भाऊ यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
रोहितने लहान असताना मुंबईच्या या ऐतिहासिक स्टेडियमवर खेळण्याचे स्वप्न पाहिले होते आणि ते त्याने कष्टाने पूर्णही केले. भारतीय संघाचा व मुंबई इंडियन्सचा कर्णधार, खेळाडू म्हणून त्याने हे मैदान गाजवले आहे. त्याच्या फटकेबाजीने त्याला याच स्टेडियमवर ‘हिटमॅन’ म्हणून हाक मारली जाते. त्याचबरोबर ‘मुंबईचा राजा रोहित शर्मा’ असे देखील चाहते त्याला प्रोत्साहित करण्यासाठी बोलतात आणि त्यातून त्याच्याप्रती असलेले प्रेम दिसते. यावेळी उपस्थित प्रेक्षक आणि चाहत्यांच्या टाळ्यांच्या गजरात रोहितच्या या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनणे, हे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. रोहितला त्याच्या क्रिकेटमधील अमूल्य योगदानाबद्दल मुंबई क्रिकेट असोसिएशन कडून हा विशेष सन्मान देण्यात आला आहे.
आई-वडीलांसह पत्नी भावुक
रोहीत शर्माच्या स्टँडचे उद्घाटन करण्यासाठी रोहित समोर बसलेल्या त्याच्या आई-वडिलांना तो मंचावर घेऊन आला. त्यांच्या हस्ते या स्टँडच्या नावाचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांच्या बाजूला उभी असलेली रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह हि देखील भावनिक झाली. रितिकाने याआधी अनेकदा रोहितच्या यशात नेहमीच सहभाग दिला आहे; मात्र, या क्षणी तिच्या भावना अनावर झाल्या. रोहितने देखील हा सन्मान आपल्या कुटुंबासमोर मिळाल्याने भावुक होत, त्यांना धन्यवाद दिले आहेत.
शरद पवार यांच्यासोबत नाव
यावेळी बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, हा दिवस माझ्यासाठी खास आहे. एक लहान मुलगा ज्याला, मुंबईकडून, भारताकडून खेळायचे होते आणि त्याने ते स्वप्न पूर्ण केले. परंतु, या ऐतिहासिक स्टेडियमवर माझ्या नावाचे स्टँड असेल याची कल्पनादेखील मी कधी केली नव्हती. क्रिकेटमधील अनेक दिग्गजांसोबत तसेच जगातील ग्रेट लिडरपैकी एक असलेल्या शरद पवार यांच्यासोबत माझे नाव दिसत आहे, हे मला खूप भारी वाटत आहे. माझ्या या यशात माझ्या कुटुंबियांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. त्यांच्यामुळेच मी येथे तुमच्यासमोर उभा आहे, असे म्हणत त्याने माजी बीसीसीआय अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेदेखील आभार मानले.