उन्हाळी भातशेतीचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांकडून नुकसानभरपाईची मागणी
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावर पुगाव, मुठवली बुद्रुक व खांब गाव आदी परिसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळी भात शेती केली जाते. हमखास पाणी, पोषक वातावरण, शेतीची योग्य मशागत आणि हवामानाची साथ यामुळे उन्हाळी भात शेती मधून शेतकऱ्यांना हुकमी पिक व उत्पन्न मिळते. मात्र अवकाळी पावसामुळे हे हुकमी पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. सध्या येथे पाण्याने भरलेल्या शेतात भात कापणीची व झोडणीची कामे सुरु आहेत.
काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांची उन्हाळी भातशेतीच्या कामांची लगबग सुरु होती. टपोऱ्या भाताच्या लोंब्या डोलू लागल्या होत्या. त्यामुळे हाती भरघोस पीक लागणार यामुळे शेतकरी सुखावले होते. अनेकांनी 10 मे नंतर भात कापणीचे नियोजनसुद्धा केले होते. मात्र, ऐनवेळी अवकाळी पावसाने घात केला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भातपिकाचे नुकसान झाले आहे. शेतामध्ये पाणी साठले आहे. नाईलाजाने भिजलेला भात शेतकऱ्यांना कापावा लागत आहे. या भाताला भावदेखील मिळणार नाही. तसेच पेंढा भिजल्याने पेंढ्यालादेखील भाव मिळणार नाही. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
हुकमी पीक
हमखास पाणी, पोषक वातावरण, शेतीची योग्य मशागत आणि हवामानाची साथ यामुळे उन्हाळी भातशेतीमधून शेतकऱ्यांना हुकमी पीक मिळते. पावसाळ्यातील शेतीतून मिळणाऱ्या उत्पादन व उत्पन्नापेक्षा उन्हाळी शेतीतून अधिक चांगले उत्पादन व उत्पन्न मिळते. त्यामुळे शेतकरी समाधानी असतात. काही शेतकरी तर पावसाळ्याऐवजी उन्हाळी शेती करण्यास प्राधान्य देतात. मात्र, यंदा अवकाळी पावसाने उन्हाळी भातशेतीचे मोठे नुकसान केले.
मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडल्याने शेतामध्ये पूर्णपणे पाणी साठले. त्यामुळे भात पूर्णपणे भिजून खराब झाले आहे. त्याला भावदेखील मिळणार नाही. तब्बल 25 ते 30 हजारांचे नुकसान झाले आहे. शासनाने याची दखल घेऊन तात्काळ पंचनामा करावा व नुकसानभरपाई द्यावी, अशी विनंती आहे.
चंद्रकांत येळकर,
शेतकरी, पुगाव, ता. रोहा