पुस्तक प्रकाशन व गणेश घाट लोकार्पणाचा कार्यक्रम
| पोलादपूर | प्रतिनिधी |
मूळ शेतकरी कामगार पक्ष कधीही फुटत नसतो. कार्यकर्त्यांची नाळ शेकापच्या डाव्या विचारांसोबत जुळलेली असल्यामुळे जे अलीकडेच शेकापमध्ये आले त्यांनी विचारधनांपेक्षा ठेकेदारीच्या माध्यमातून धन कमविण्यासाठी दुसर्या पक्षामध्ये जाण्याची भूमिका घेतली तरी धारवली विभागातील शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते ठामच असल्याचा दावा तालुका चिटणीस वैभव चांदे यांनी केला.
धारवली विभागातील डॉ. आशिष जैतपाल यांच्या ‘निबंधकोश-विचार विमर्श’ पुस्तकाचे प्रकाशन तसेच कुळेवाडी येथील श्रीगणेश विसर्जनकरिता श्रीगणेश घाटाचे लोकार्पण आदी कार्यक्रम शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या इच्छेने आयोजित करण्यात आले असता वैभव चांदे यांनी हा दावा केला. पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच शेतकरी कामगार पक्षाचे महाड विधानसभा चिटणीस एकनाथ गायकवाड, पोलादपूर तालुका चिटणीस वैभव चांदे, धारवली ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच विलास सकपाळ, मनोहर पार्टे, धारवली मुंबई मंडळाचे अध्यक्ष पवार, पळचिल हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय जैतपाल व सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
धारवली ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील कुळेवाडी येथील श्रीगणेश विसर्जनाकरिता कुळेवाडी येथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने श्रीगणेश घाट बांधून देण्यात आला. त्याचे लोकार्पण सरपंच विलास सकपाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेकापचे मनोहर पार्टे, मुराद तांबे, समीर चिपळूणकर, अमजद करबेलकर, संजय महाडिक, प्रमोद महाडीक, शैलेश सुतार, भगवान सकपाळ व स्थानिक कार्यकर्ते तसेच कुळेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.