माथेरानच्या कस्तुरबा रस्त्यावर थाटली हॉटेल
| माथेरान | वार्ताहर |
ब्रिटिश राजवटीत 1850 मध्ये स्थापन झालेल्या टुमदार अशा माथेरान पर्यटनस्थळी रस्त्यालगत असणारी मुबलक जागा वनखात्याच्या अखत्यारीत येत आहे. परंतु, या जागांवर हॉटेलधारकांनी अतिक्रमणे करून जागा व्यापलेल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यांना मोकळा श्वास मिळणे आता कठीण बनले आहे.
मुख्य रस्त्यावरसुध्दा बहुतांश ठिकाणी वनखात्याच्या जागेवर हॉटेलधारकांनी राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या आशीर्वादाने त्यांना चिरीमिरी देऊन कब्जा केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. जवळजवळ स्वतःच्या ताब्यात घेतल्याप्रमाणेच त्या जागांचे सुशोभिकरण करून हॉटेलमधील पर्यटकांना बसण्यासाठी त्याचप्रमाणे लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी लावून अतिक्रमणे केलेली आहेत. त्यातच ब्रिटिश कालखंडात याठिकाणी 38 पॉईंट्स असताना काही व्यावसायिकांनी स्वतःच्या फायद्यासाठी काही मोकळ्या जागेवरील रस्त्याच्या बाजूला असणार्या डोंगर दर्यांना नवनवीन नावे देऊन स्वतःच्या मर्जीने पॉईंट बनवून पर्यटकांची दिशाभूल करून या स्थळाची प्रतिमा मलीन करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न काही वर्षांपासून सुरू आहे. अशा नवीन बनविण्यात आलेल्या पॉईंट्सवर टपर्या लावून त्या त्या ठिकाणी झाडांची कत्तल होत असल्याने काही वर्षातच हे स्थळ माथेरानऐवजी मोकळे रान म्हणून प्रसिद्धी मिळवेल, अशी भीती स्थानिक भूमीपुत्रांना वाटत आहे.
कस्तुरबा रोडवरील खान हॉटेलपर्यंत आणि त्यापुढेही हॉटेलधारकांनी रस्त्याच्या बाजूला स्वतः कंपाऊंड बनवून जागा व्यापलेल्या आहेत. निदान वनखात्याच्या वरिष्ठांनी याठिकाणी भेट देऊन आपल्या जागा ताब्यात घेणे गरजेचे आहे परंतु याकडे या खात्याने आणि आपला पाच वर्षांचा कालावधी संपला असतानादेखील नगरपरिषदेच्या निवडणुका झाल्या नसल्याने एकप्रकारे तीन वर्षे बोनस म्हणून कार्यरत असलेल्या गावाची उत्तम सेवा करणार्या वनसमितीच्या पदाधिकार्यांनीसुद्धा पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे की काय, असा प्रश्नसुद्धा स्थानिकांमधून उपस्थित केला जात आहे. याबाबत वनखात्याच्या अधिकार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.