| नवी मुंबई | प्रतिनिधी |
तुर्भे येथील शिवछाया मित्र मंडळ यावर्षी 54 वा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत आहे. नवी मुंबईचा राजा अशी ख्याती असलेल्या या मंडळाने ‘शिवराज्याभिषेक’ देखावा उभारला आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी व आकर्षक ठरलेला देखावा पाहण्यासाठी पहिल्या दिवसापासूनच भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे.
सभामंडपात 80 फूट लांब, 40 फूट रुंद व 25 फूट उंच अशा आकाराचा शिवराज्याभिषेकाचा देखावा असून, यात श्री गणेशाची दहा फुटांची मूर्ती विराजमान झाली आहे. सालाबादप्रमाणे मंडाळातर्फे भजन, हरिपाठ, रक्तदान, आरोग्य शिबीर, आयुर्वेदिक चिकित्सा, अन्नदान, अथर्वशीर्ष वाचन, नवी मुंबईतील कलावंतांचा सन्मान केला जात आहे. दर्शनासाठी येणार्या भाविकांना पोस्टरच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात येत आहे. तसेच प्लास्टिक मुक्तीचा जागर करत गणेशोत्सवादरम्यान लाखो भाविकांना कापडी पिशव्यांचे वाटप केले जाणार आहे.
हा भव्य दिव्य उत्सव साजरा करण्यासाठी अध्यक्ष अंकुश वैती, उपाध्यक्ष सुशील घरत, सचिव अशोक पाटील, खजिनदार रामकृष्ण पाटील, संजय गुरव, नंदकुमार पाटील, विजय पाटील, अनिल हेलेकर आदी विशेष मेहनत घेतात.