वीज ग्राहकांमध्ये संतापाची लाट
| श्रीवर्धन | वार्ताहर |
महावितरणाकडून एप्रिल महिन्याची वीज देयके ग्राहकांना देताना त्याबरोबर अतिरिक्त सुरक्षा ठेव असे देखील एक बिल ग्राहकांना देण्यात आलेले आहे. मागील वर्षी देखील अशाच प्रकारचे बिल ग्राहकांना महावितरणने दिले होते. महावितरण ग्राहकांकडून अजून किती वेळा अशा प्रकारची अतिरिक्त सुरक्षा ठेव देयके घेणार आहे. हा प्रश्न ग्राहकांसमोर उपस्थित होत आहे.
कारण दर महिन्याचे वीज बिल आल्यानंतर ग्राहक आपले बिल महावितरणच्या कार्यालयात जाऊन कॅश स्वरूपात भरत असतात. तर अनेक ग्राहक आपले बिल ऑनलाईन भरत असतात. काही ग्राहकांनी आपली बिले खात्यातून ऑनलाइन जमा व्हावी, यासाठी तशा प्रकारच्या योजनेची तरतूद केलेली असते. प्रत्येक महिन्याचे वीज बिल तयार झाल्यानंतर ग्राहकाला मेसेज पाठवण्यात येतो की, आपले बिल येत्या दोन दिवसात खात्यामध्ये येणार आहे. तरी आपल्या खात्यामध्ये योग्य ती रक्कम तयार ठेवावी. सदरची बिले दोन दिवसानंतर खात्यात येऊन महावितरणला ते पैसे खात्यामधून ऑनलाइन प्रणाली द्वारे प्राप्त होतात.
परंतु सरसकट ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेव देयके रु. 2800 ते 3000 पर्यंत पाठवून महावितरण ग्राहकांवरती कोणत्या प्रकारे दबाव तयार करण्याचा प्रयत्न करत आहे? अगोदरच महावितरणच्या वीज बिलामध्ये अनेक प्रकारचे आकार लावलेले असतात. अतिरिक्त आकार, इंधन समायोजन आकार, स्थिर आकार, वीज आकार, वीज शुल्क, वीज विक्री कर, व्याज, निव्वळ थकबाकी, व्याजाची थकबाकी, अशाप्रकारे अनेक आकार लावलेले वीज बिल ग्राहकांना देण्यात येते. बरे एवढे सगळे आकार असून देखील, ग्राहक वीज बिल वेळेत भरत असतात.
महावितरणने कोणत्या आधारावरती अतिरिक्त ठेव देयक ग्राहकांकडून वसूल करण्यासाठी देयके दिली आहेत? हा मोठा प्रश्न आहे. जर महावितरणने अशा वीज देयकांची जबरदस्तीने वसुली केल्यास, ग्राहक न्यायालयात याबाबत दाद मागण्याचा वीज ग्राहकांचा विचार आहे असे बोलले जात आहे.