। पनवेल । वार्ताहर ।
पनवेलमधील रहिवाशांना जून महिन्यापर्यंत न्हावाशेवा टप्पा 3 या योजनेतून जादा 50 दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नियोजन केले आहे.
एप्रिल महिन्यात न्हावाशेवा टप्पा तीन योजनेतील पाताळगंगा नदीवरील पाणी उपसा करणार्या पंपहाऊसच्या उभारणीचे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती एमजेपीचे उपअभियंता रमेश वायदंडे यांनी दिली. या योजनेतील निम्मे तरी पाणी पनवेल पालिकेला जून महिन्यापर्यंत जादा देण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचे एमजेपीने स्पष्ट केले.
पनवेल महापालिका आणि सिडको वसाहतींना एमजेपीकडून 120 दश लक्ष लीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. न्हावाशेवा टप्पा तीन ही योजना एकूण 228 एमएलडी पाणी पुरवठ्यासाठी बनविण्यात आली होती. यासाठी 350 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ही योजना पूर्णपणे कार्यान्वित झाल्यावर पनवेल महापालिकेला 100 एमएलडी, जेएनपीएला 40 एमएलडी, सिडको मंडळाला 69 एमएलडी आणि एमएमआरडीएला 19 एमएलडी असा पाणीपुरवठा केला जाणार आहे. या योजनेच्या कामाचे कार्यादेश संबंधित कंपनीला 2022 ला देण्यात आले. हे काम 30 महिन्यांत पूर्ण करण्याची मुदत सरकारने दिली होती. मात्र, एकाच कंत्राटदार कंपनीवर संपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी दिल्यामुळे वाढलेल्या साहित्याच्या दरामुळे काम अनेक महिने ठप्प होते. त्यामुळे कामाची मुदत पुन्हा 15 महिन्यांनी वाढविण्यात आली. मात्र, वाढवलेल्या मुदतीनंतरही काम पूर्ण न करु शकल्याने अजून काही महिन्यांची मुदत वाढीचा प्रस्ताव एमजेपीच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याची माहिती एमजेपीचे उपअभियंता वायदंडे यांनी दिली.
एप्रिल महिन्यात पाताळगंगा नदीवरील वायाळ स्टेशन येथील पंपहाऊसचे काम पूर्ण होण्याचे नियोजन आहे. योजनेतील 50 एमएलडी पाणी जून महिन्यात मिळेल असे नियोजन आहे.
रमेश वायदंडे,
उपअभियंता, एमजेपी