खा. राजन विचारेंच्या हौशीसाठी मच्छिमारांना आणलं रस्त्यावर?
बंगल्यासमोरील रस्ता केला मोकळा; नागरिकांच्या घरांवर बुलडोझर
। अलिबाग । भारत रांजणकर ।
सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन असल्याचे कारण देत अलिबाग तालुक्यातील आक्षी ग्रामपंचायत हद्दीतील समुद्रकिनार्यावरील महेश गण यांच्या बांधकामावर अलिबाग तहसील कार्यालयाने पोलीस बंदोबस्तात बुलडोझर फिरवला. खा. राजन विचारे यांचा समुद्रावर येण्या-जाण्यासाठीचा रस्ता मोकळा राहावा यासाठी मासेमारीचे साहित्य ठेवण्यासाठी पंचायत दरबारी नोंद असलेली जागा असून, त्या बांधकामावर तहसीलदार कार्यालयाने कारवाई करून सर्वसामान्य मच्छिमाराला रस्त्यावर आणले असल्याचा आरोप पीडित मच्छिमार महेश बाळाराम गण यांनी केला आहे.
आक्षी येथील समुद्रकिनार्यालगत महेश गण यांनी घर बांधण्यासाठी पायाचे बांधकाम केले आहे. या पायाबाबत शासनाकडे तोंडी तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार महेश गण यांना नोटीस बजावण्यात आली होती. सदर बांधकाम सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन करुन करण्यात आल्याचे यात म्हटले आहे. त्यानुसार सदर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली. यावेळी अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के.डी. कोल्हे, नायब तहसीलदार संदीप पानबंद, तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी आदींसह मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र, यावेळी कोणताही विरोध न झाल्याने सदर कारवाई शांततेत पार पडली.
दरम्यान, या कारवाईबाबत सदर बांधकाम करणारे महेश गण यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यानुसार खासदार राजन बाबुराव विचारे यांची जागा आक्षी येथे समुद्रापासून काही मीटर अंतरावर आहे. या जागेत त्यांनी बंगल्याचे बांधकाम केले आहे. या जागेत जाण्यासाठी दोन गेट असून, पाठीमागील गेटमधून समुद्राकडे जाण्यासाठी मार्ग आहे. मात्र, या बंगल्यानजीक पूर्वीपासून परंपरागत महेश गण यांचे मच्छिमारी करण्याचे साहित्य, तसेच उन्हाळ्यात मासळी सुकविण्यासाठीची जागा आहे. या जागेला आक्षी ग्रामपंचायत दरबारी नोंद असून, त्याचा नंबर 637 असा आहे. ही नोंद 2001 साली करण्यात आली आहे, तेव्हापासून आजपर्यंत महेश गण हे त्या जागेचा कर ग्रामपंचायत दरबारी जमा करीत आहे. तसेच गण यांच्या जागेच्या शेजारी गावातील इतर कोळी समाज बांधव यांची जागासुद्धा आहे.
महेश गण यांनी पुढे सांगितले, की मोठ्या कष्टाने सदर जुन्या पायाचे नवीन बांधकाम करीत होते. खासदार विचारे यांच्या बंगल्याच्या समुद्राकडे जाणार्या गेटजवळ माझी जागा असल्याने मला जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. त्या ठिकाणी इतर बांधकाम करणार्यांना नोटीस न देता अथवा कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता केवळ गण यांना नोटीस देऊन बांधकाम अनधिकृत ठरविले आहे. तसेच तहसीलदार यांनी गण यांच्या जागेवर जेसीबी फिरविण्याचा आदेश दिला. सदर कारवाई करीत असताना या पायावर असलेली लाखो रुपयांच्या मासेमारी जाळ्यांचेदेखील नुकसान झाले आहे. यामुळे आमच्या कुटुंबावर उपासमारीचे वेळ आली असल्याचा आरोपही गण यांनी केला आहे.