अलिबाग तालुक्याला पावसाचा फटका

अनेक घरांसह सखल भागांमध्ये पाणी

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यासह अलिबाग तालुक्यालादेखील मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. एका दिवसात 154 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात पाणी साचल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. अनेक घरांसह सखल भागांमध्ये पाणी साचले. झाडे उन्मळून पडल्यामुळे तसेच रस्त्यांवर पाणी साचल्याने अलिबाग-रोहा, अलिबाग-पेण, अलिबाग- रेवस, अलिबाग-रेवदंडा मार्गावरील वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. कित्येक तास वाहतूक सेवा ठप्प झाली होती.

प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद
पावसामुळे कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी कोणीही कामाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पावसाच्या भीतीने नागरिकांनी घरातून बाहेर पडणे टाळले. वेगवेगळ्या वस्तू, खाद्य पदार्थ खरेदीसाठी फुलणाऱ्या बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. त्यामुळे बाजारपेठेवरही त्याचा परिणाम झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

एसटी बसेसच्या फेऱ्या रद्द
जिल्ह्यामध्ये नद्यांसह धरणे, शेतांमध्ये पाणी प्रचंड साचले. खाड्यांना उधाणाचे स्वरुप प्राप्त झाले होते. त्यामुळे रामराज, महाजने येथील नदी पाण्याने तुडूंब भरून गेली होती. रामराज-बोरघर मार्गावरील पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे रामराजकडे जाणाऱ्या एसटी बसेसच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या. अलिबाग-सुडकोली मार्गावरील कावीर येथील स्थानकाजवळ, आक्षी, तसेच चोंढी जवळी कनकेश्वर फाट्यानजीक झाड उन्मळून पडले होते. त्यामध्ये कनकेश्वर फाट्याजवळ उभ्या असलेल्या कारचे नुकसान झाले. या रस्त्यांवर झाड कोसळल्याने वाहतूक सेवा काही तास बंद झाली होती. पाली,- सुधागडमध्ये पाणी असल्याने अलिबाग आगारातून सुटणारी पाली, नागोठणे एसटी बस सेवा बंद केली होती. तसेच नागोठणे बस स्थानक व अलिबाग एसटी बस स्थानकात पाणी साचल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. गुडघाभर पाण्यातून मार्ग काढत प्रवाशांना पायी प्रवास करावा लागला. रोहा आगारातून सकाळी तीन शाळेच्या फेऱ्या व पुणेकडे जाणारी एसटी बस पाण्यामुळे रद्द करण्यात आल्याची माहीती एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

शहरासह परिसरात साचले पाणी
अलिबाग शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागली. शहरातील चुंबकीय वेधशाळेची संरक्षक भिंत कोसळली. तसेच तेथील एक झाड कोसळली. सुदैवाने जीवितहानी टळली. तसेच अलिबाग-पेण मार्गावरील चेंढरे बायपास रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. वाहनांसह पादचाऱ्यांना प्रवास करताना अडथळे निर्माण झाले होते. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीच वेग मंदावला होता. थळकर नगरमध्ये पाणी साचले आहे. आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी नगरपरिषदेचे नियंत्रण कक्ष कार्यान्वीत असून, गटार साफ करण्यापासून झाडांची पडझड झाल्यास पथक तैनात केले आहेत. तसेच आपत्कालीन काळात नगरपरिषदेची शाळा व समाज मंदिरात राहण्याची व्यवस्था केली असल्याची माहिती नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अंगाई सांळुखे यांनी दिली.

प्रकाश पाटील यांच्या घरात शिरले पाणी

अलिबाग तालुक्यातील सुडकोली येथील प्रकाश पाटील यांच्या जवळ मुख्य रस्त्यातून जाणारी पाईपलाईन बंद करण्यात आली आहे. या बंद पाईपलाईनमुळे पावसाचे पाणी प्रकाश पाटील यांच्या घरात शिरले आहे. परिसरातदेखील पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी प्रकाश पाटील यांनी अनेक वेळा केली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षपणामुळे गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे प्रकाश पाटील यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

रामराज बाजारपेठेत पाणी

अलिबाग तालुक्यातील रामराज बाजारपेठ ही तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. मंगळवारपासून सुरु झालेल्या पावसामुळे रामराज नदीला पूर आला. त्यामुळे रामराज बाजारपेठेत गुडघाभर पाणी साचले होते. बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले.

भातलावणीचे काम ठप्प
शेतकरी भातलावणीच्या कामात मग्न असताना गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. मंगळवारी सायंकाळपासून सुरु झालेल्या पाऊस सतत सुरु राहिल्याने शेतांमध्येदेखील पाणी मोठ्या प्रमाणात साचले असून, बांधावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे भात लावणीच्या कामांवर त्याचा परिणाम झाला असून, ठप्प झाल्याचे दिसून आले.

Exit mobile version