एशियन लाठी स्पर्धेत अलिबागच्या लावण्याला दोन सुवर्णपदके

। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील वाडगाव गावच्या लावण्या प्रवीण भगतने भारताच्या ज्युनिअर लाठी संघातून खेळताना नेपाळ येथे नुकत्याच झालेल्या एशियन लाठी स्पर्धेमध्ये देदीप्यमान कामगिरी केली आहे. तिने भारतासाठी दोन सुवर्णपदक पटकाविले आहेत. या सुवर्ण कामगिरीमुळे अलिबागच्या नावलौकिकामध्ये मानाचा तुरा रोवत अलिबागचे नाव सातासमुद्रापार नेले आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल अलिबागकरांकडून लावण्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
आधुनिक युगातही लाठी हा परंपरागत खेळ पुढे नेण्याचे काम अनेकजण करीत असतात. त्यामध्ये वाडगाव येथील लावण्या भगतने सोलपूर येथे झालेल्या दुसर्‍या राष्ट्रीय लाठी स्पर्धेत महाराष्ट्र संघातून नेत्रदीपक कामगिरी केली होती. त्यामुळे लावण्या भगत हिची भारताच्या ज्युनिअर लाठी संघामध्ये निवड झाली होती. तसेच निवड झाल्यानंतर सर्वांचा तिच्यावरचा विश्‍वास कायम ठेवत दोन सुवर्णपदकांची कमाई करत अलिबागकरांची मान उंचावली आहे.

Exit mobile version