। मुरूड। वार्ताहर ।
नेपाळ काठमांडू येथे सुरू असलेल्या साऊथ एशियन लाठी स्पर्धेत भारत देशाकडून खेळताना प्रियेश प्रचित मसाल याने द्वियम व पंचम लाठी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवित भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई केली आहे. या यशाबरोबरच त्याने देशासोबत मुरुडच्या शिरपेचात दुसरा मानाचा तुरा रोवला आहे. मुरूडच्या सुपुत्रांनी मिळविलेल्या यशामुळे मुरुडमध्ये सर्व स्तरावरुन स्नेहापाठोपाठ प्रियेशवरसुद्धा कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दि. 28 मे रोजी आठ वर्षांखालील मुलांच्या गटात भारतातर्फे खेळताना प्रियेश मसालने द्वियम लाठी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर पंचम लाठी स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करून प्रथम क्रमांक पटकावून भारतासाठी सुवर्णपदक पटकावले आहे. स्नेहा व प्रियेश या दोघा भावंडांनी सुवर्णपदक कमावून भारत देशाबरोबर मुरुडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.