| अलिबाग । प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील रुळे येथील 24 वर्षीय तरुण पाण्याने भरलेल्या डोऱ्यात मृत अवस्थेत दिसून आला. त्याचे हातपाय बांधलेले असल्याने त्याचा मृत्यू संशयास्पद असल्याची चर्चा पोलीसांत सुरू आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली असून अलिबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
भुषण मुळुस्कर असे या तरुणाचे नाव आहे. हा तरूण गुरुवारपासून बेपत्ता होता. रात्री तो घरी आला नाही म्हणून त्याचा शोध सुरू केला. अखेर रुळे येथील शेतातील पाण्याने भरलेल्या डोऱ्यात तो बेशुद्ध अवस्थेत दिसून आला. या घटनेची माहीती मिळताच अलिबाग पोलीसांनी घटना स्थळी धाव घेतली.
रुळे गावातील शेतावर पाण्याने भरलेल्या डोऱ्यामध्ये नायलॉन दोरीने हातपाय बांधलेले व कमरेत दोन सिमेंटच्या पोत्यामध्ये दगडे भरून त्या पिशव्या दोरीने कमरेला बांधलेल्या दिसून आल्या. त्याला अलिबागमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरानी तो अगोदरच मृत अवस्थेत असल्याचे सांगितले. या घटनेने तरुणाची हत्या की आत्महत्या? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.