क्रिकेटमधील जशी आयसीसी किंवा फुटबॉलमध्ये फिफा तशी बुध्दिबळात फिडे ही सर्वोच्च कारभारी संस्था आहे. बुध्दिबळातील ग्रँडमास्टर, इंटरनॅशनल मास्टर असे किताब ती देते. त्यासाठीचे निकष बघण्यासारखे आहेत. एखाद्या खेळाडूला ग्रँडमास्टर ठरवताना त्याचे गुण किंवा त्याचा खेळ महत्वाचा असतोच. पण तो अशाच अन्य जागतिक ग्रँडमास्टर्स किंवा विजेत्यांसोबत किती सामने खेळला आहे हीदेखील कसोटी असते. या सामन्यांमध्ये तो हरला की जिंकला हे महत्वाचे नसते. तो या दादा खेळाडूंच्या विरुद्ध खेळला हे पुरेसे असते. त्यामुळेच अझरबैजानमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत गुरुवारी आर. प्रज्ञानंद हा पराभूत झाला असला तरीही बुध्दिबळाच्या इतिहासात एक पराक्रमी खेळी अशीच त्याची नोंद होईल. प्रज्ञानंदची गाठ नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनसोबत होती. पाच वेळा जागतिक अजिंक्यपद जिंकणारा कार्लसन फिडे मानांकनामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. त्याउलट मानांकनामध्ये प्रज्ञानंद 31व्या क्रमांकावर होता. तो अंतिम फेरीत येण्याची मजल मारू शकेल असे त्याचा खेळ नेहमी पाहणाऱ्या भारतातील अनेकांनादेखील वाटत नव्हते. प्रत्यक्षात प्रज्ञानंदाने कमाल केली. त्याने कार्लसनच्या पाठोपाठ जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या असलेल्या हिकारू नाकामुरा आणि तिसऱ्या असलेल्या फाबियानो कारुना यांना आधीच्या फेऱ्यांमध्ये गारद केले. त्यामुळे अंतिम फेरीतही तो धक्का देईल असे वाटू लागले होते. त्यानुसार त्याने कार्लसनसोबतचे पहिले दोन सामने अनिर्णित राखण्यात यश मिळवले. हे सामने कसोटी क्रिकेटसारखे होते. त्यात निर्णय न लागल्यामुळे मग वीस षटकांप्रमाणे टायब्रेकरचे दोन सामने खेळवले गेले. या स्पर्धेमध्ये व एरवीही वेगवान खेळी करताना प्रज्ञानंद हा प्रतिस्पर्ध्यांना भारी ठरतो हे दिसले होते. पण शेवटी कार्लसनने अनुभवाच्या जोरावर मात केली. तसाही ब्लिट्झक्रिग म्हणजे वेगवान बुध्दिबळ सामन्यांचे जागतिक अजिंक्यपद सहा वेळा जिंकण्याचा विक्रम कार्लसनच्या नावावर जमा आहेच. एखाद्या रुग्णवाहिकेच्या चालकाप्रमाणे अत्यंत वेगवान खेळ त्याने केला व प्रज्ञानंदाला विचार करायला वावच ठेवला नाही असे वर्णन करण्यात आले आहे.
कार्लसनचा दबदबा
कार्लसनने पाच वेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकलेली आहे. 2011 पासून म्हणजे गेली बारा वर्षे जागतिक मानांकनामध्ये तो पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र तरीही त्याला आजवर विश्वचषक स्पर्धेत यश मिळाले नव्हते. 2017 मध्ये तो अत्यंत दारुणरीत्या पराभूत झाला होता. अलिकडे त्याने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतूनही माघार घेतली होती. त्या स्पर्धेसाठी करावी लागणाऱ्या मानसिक तयारीचा त्याला थकवा आला व त्याने ती सोडून दिली. मात्र विश्वचषक स्पर्धेत आपण एकदाही जिंकलेलो नाही हा इतिहास त्याला बदलायचा होता. त्यामुळेच तो यंदाच्या स्पर्धेत उतरला. कसोटी क्रिकेटसारख्या अत्यंत जुन्या रीतीने खेळल्या जाणाऱ्या या सामन्यांमध्ये मी काय करतो आहे असा प्रश्न आपल्याला पडला होता असे त्याने ही स्पर्धा चालू असताना दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते. मला ही स्पर्धा भयंकर कंटाळवाणी व थकवणारी वाटते असे त्याचे म्हणणे होते. महेंद्रसिंग धोनीला कसोटी क्रिकेट खेळताना वाटावी अशी ही भावना होती. पण तरीही त्याने आपला निश्चय टिकवून ठेवला व अंतिमतः विजय मिळवला. प्रज्ञानंदला या निर्धाराशी टक्कर द्यायची होती. अर्थात, प्रज्ञानंदचा आजवरचा प्रवास हाही विलक्षण बुध्दिमत्ता आणि निर्धार यांचा मिलाफ आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून तो खेळत असून त्याच्यापाशी मोठी प्रतिभा आहे हे खूप लहानपणीच त्याच्या कुटुंबियांच्या लक्षात आले होते. 2016 मध्ये अवघा दहा वर्षांचा असताना तो इंटरनॅशनल मास्टर झाला. दोन वर्षांनंतर बारा वर्षांचा असताना तो ग्रँडमास्टर झाला. इतक्या लहान वयात ग्रँडमास्टर होणारा तो जगातला दुसरा खेळाडू होता. आणखी दोन वर्षांनी म्हणजे वयाच्या चौदाव्या वर्षी त्याने फिडे रेटिंगमध्ये 2600 पेक्षा अधिक गुण मिळवले. तो त्यावेळी जागतिक विक्रम ठरला. त्याहीवेळी जागतिक अजिंक्यपद मिळवणे हेच आपले स्वप्न आहे असे त्याने स्पष्टपणे सांगितले होते.
तमिळनाडूचे उदाहरण
सध्या भारतात बुध्दिबळ खेळाडूंची एक मोठी फळीच तयार झाली आहे. विशेष म्हणजे यातले बहुतांश खेळाडू विशीच्या आतबाहेरचे तरूण आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर विस्तीर्ण अवकाश आहे. विश्वचषकाच्या स्पर्धेतही चार भारतीय खेळाडू उतरले होते. त्यातील सतरावर्षीय डी. गुकेश याने गेल्याच महिन्यात 2750 हून अधिक गुणसंख्या नोंदवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. लाईव्ह मानांकनामध्ये त्याने विश्वनाथन आनंदला देखील मागे टाकले होते. सध्या भारतात एकूण 82 ग्रँडमास्टर्स आणि 128 इंटरनॅशनल मास्टर्स आहेत. 1988 मध्ये विश्वनाथन आनंदने ग्रँडमास्टर किताब मिळवला. त्यानंतर झालेली ही प्रगती अभिमानास्पद आहे. आनंद याच्यामुळे तमिळनाडूतील बुध्दिबळ खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळाली. एकेकाळी मुंबई ही जशी क्रिकेटपटूंची खाण होती तसा प्रकार सध्या तमिळनाडूबाबत घडतो आहे. गेल्या दहा वर्षात त्या राज्यातून तब्बल अठरा जण ग्रँडमास्टर झाले आहेत. महाराष्ट्रातही या खेळाची मोठी परंपरा आहे. प्रवीण ठिपसे हे भारताचे पहिले
ग्रँडमास्टर. त्यांनी 1984 मध्ये तो किताब मिळवल्यावर चार वर्षांनी आनंदने तो पटकावला. प्रवीण यांच्या पत्नी भाग्यश्री याही इंटरनॅशनल मास्टर आहेत. याखेरीज खाडिलकर भगिनी, अभिजित कुंटे अशा अनेकांनी राज्याचे नाव मोठे केले. गेल्या दहा वर्षात राज्यातून दहा ग्रँडमास्टर घडले. तमिळनाडू सरकारने गेल्या वर्षी सुमारे शंभर कोटी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा भरवली होती. ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी याच रीतीने हॉकीला प्रोत्साहन देण्याची योजना राबवली होती. त्यातून त्या राज्यात जागतिक दर्जाचे मैदान उभे राहिले व आंतरराष्ट्रीय स्पर्धाही भरवण्यात आल्या. ओरिसानेच हॉकी संघ प्रायोजित केला होता. इच्छाशक्ती असेल तर छोटी राज्येही क्रीडा संस्कृती विकसित करू शकतात. नरेंद्र मोदींसारख्या जाहिरातबाजीची त्यासाठी गरज नसते. महाराष्ट्राने यापासून धडा घेऊन बुध्दिबळाला प्रोत्साहन द्यायला हवे.