| अलिबाग | प्रतिनिधी |
गर्दीचा फायदा घेत तीन महिलांनी एसटी बसमधून सोन्याची चेन व रोख रक्कम चोरली होती. मात्र तेथील वाहकाची सतर्कता व सीसीटीव्ही कॅमेरांमुळे चोरीचा प्रकार उघडकीस आला. सोमवारी दुपारच्या दरम्यान अलिबाग स्थानकात फलाट क्र.1 जवळ ही घटना घडली. यामध्ये तीन महिलांना अलिबाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अलिबाग एसटी बस स्थानकातील फटाक क्र.1 येथे दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास रेवस एसटी बस उभी करण्यात आली. दरम्यान गर्दीचा फायदा घेत तीन अज्ञात महिलांनी दोन महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याची चेन व पर्समधील काही रक्कम लंपास केले. ही बाब प्रवाशी महिलांच्या लक्षात आल्यावर त्यांनी गोंगाट केला. एसटी बसमधील वाहकाने सतर्कता दाखवत बस आगारात नेली. त्यानंतर अलिबाग पोलीसांना पाचारण करण्यात आले. गोपनीय शाखेतील पोलीस हवालदार हर्षल पाटील, पोलीस हवालदार झिराडकर, शेलार तसेच महिला पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांच्या मदतीने एसटीतील प्रवाशांची तपासणी करण्यात आली. तसेच एसटी बस आगारातील सीसीटीव्ही कॅमेरांचे फुटेज पाहण्यात आले. त्यावेळी एसटीतील तीन महिला चोरी करीत असल्याचे दिसून आले. याप्रकरणी तीन महिलांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली.