अलिबागचा स्मार्ट अंगणवाडी पॅटर्न आता राज्यभर

जयंत पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश


| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अंगणवाड्यांचे स्वरूप बदलून बालकांना आधुनिक आणि दर्जेदार पूर्व प्राथमिक शिक्षण मिळावे, यासाठी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी विधिमंडळापासून शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले असून, अलिबाग तालुक्यातील 27 अंगणवाड्यांसाठी पुढे आलेला स्मार्ट अंगणवाडीचा पॅटर्न आता राज्यभर राबविला जाणार आहे. राज्यातील साडेतीन हजारांहून अधिक अंगणवाड्यांना स्मार्ट किट देण्यास मान्यता मिळाली असून, रायगड जिल्ह्यातील 182 अंगणवाड्यांचा त्यात समावेश आहे. नव्या वर्षापासून म्हणजेच 2027 मध्ये या योजनेची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

राज्यासह रायगड जिल्ह्यात मोठ्या संख्येने अंगणवाडी केंद्रे आहेत. मात्र, बदलत्या काळानुसार त्यांच्या शैक्षणिक पद्धतीत अपेक्षित बदल झालेला नव्हता. मोबाईल आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या जगात वाढणाऱ्या नव्या पिढीला आधुनिक शिक्षण मिळावे, यासाठी जयंत पाटील यांनी विधिमंडळात वारंवार आवाज उठविला. अलिबाग तालुक्यातील 27 अंगणवाड्यांमध्ये स्मार्ट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. ग्रामीण आणि आदिवासी भागातील बालकांनाही शहरी भागातील मुलांप्रमाणे आधुनिक शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, ही त्यामागील भूमिका होती. आता हाच उपक्रम राज्यभर राबविण्याचा निर्णय झाल्याने अंगणवाड्यांच्या आधुनिकीकरणाला मोठी चालना मिळणार आहे.

अंगणवाडी केंद्रांमधून सहा वर्षांपर्यंतच्या बालकांना पोषण, आरोग्य आणि पूर्वप्राथमिक शिक्षण दिले जाते. तसेच गर्भवती महिला आणि स्तनदा मातांनाही आरोग्य व पोषणविषयक सेवा पुरविल्या जातात. या केंद्रांचे रूपांतर आधुनिक, सुरक्षित आणि आनंददायी शैक्षणिक वातावरणात करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी संकल्पना राबविण्यात येणार आहे.

स्मार्ट अंगणवाडी किटमध्ये ई-लर्निंगसाठी आवश्यक हार्डवेअर व सॉफ्टवेअर, स्वच्छ भारत किट, वॉटर प्युरिफायर, हात धुण्यासाठी बेसिन, इमारतीची रंगरंगोटी, किरकोळ दुरुस्ती, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि स्वयंपाकघराचे आधुनिकीकरण अशा सुविधांचा समावेश आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यातील 182 अंगणवाडी केंद्रांना ही किट मिळणार आहेत.

अलिबाग तालुक्यातील सागवाडी, वावे, तळवली, रेवदंडा, कोळगाव, शिरवली, झालखंड, खिडकी, घसवड, खुटळवाडी, वाघोली आदिवासीवाडी, बारशेत, वाढगाव आदिवासीवाडी, नवेनगर, सुतारपाडा, कावीर, खैरवाडी, फोफेरी, चिंचवली, देहेन, रांजणखार, बोपोली, डांगी, कोळघर, मुळे, थळ, अंदोशी आणि घोटवडे अशा 27 अंगणवाड्यांचा या उपक्रमात समावेश आहे.

जयंत पाटील यांच्या दूरदृष्टीचे फलित
बालकांचे पूर्वप्राथमिक शिक्षण दर्जेदार व्हावे, त्यांच्या बौद्धिक आणि शारीरिक क्षमतांचा विकास व्हावा, यासाठी जयंत पाटील यांनी स्मार्ट अंगणवाडीचा विषय विधिमंडळात सातत्याने मांडला. अलिबागमधील 27 अंगणवाड्यांच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला आता राज्यस्तरावर यश मिळाले आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागातील बालकांनाही आधुनिक शैक्षणिक सुविधा मिळण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय असून, जयंत पाटील यांच्या दूरदृष्टीचा आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचा हा परिणाम मानला जात आहे.

विधिमंडळात काम करीत असताना सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. सत्ता असो अथवा नसो, मात्र सरकारला एखादे निर्णय घेण्यास भाग पाडले आहे. शिक्षणाचा पाया हा अंगणवाडीपासून सुरु होतो. गावे, वाड्यांमधील लहान मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे ही भूमिका कायम राहिली आहे. अंगणवाडीमधील शिक्षणाचा दर्जा चांगला आणि सक्षम राहवा, यासाठी सातत्याने विधिमंडळात स्मार्ट अंगणवाडीसाठी चर्चा केली आहे. त्यामुळे सरकारने संपूर्ण राज्यात स्मार्ट अंगणवाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे समाधान आहे. स्मार्ट अंगणवाडी कीटचा पुरवठा होताना यापुढे जागरुक राहून दर्जा बघणेही गरजेचे आहे.

जयंत पाटील,
सरचिटणीस, शेकाप
Exit mobile version