आरपीआय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्यावर कथित शाईफेक

जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सुरक्षेची मागणी; आरपीआय पदाधिकारी आक्रमक

| पाली /बेणसे | प्रतिनिधी |

रायगडच्या राजकीय वर्तुळात आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्यावर झालेल्या कथित शाईफेक प्रकरणाने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर गायकवाड यांनी संभाव्य धमकी, छळ, मारहाण तसेच खोटी किंवा बनावट तक्रार दाखल होण्याची भीती व्यक्त करत रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले आहे.

पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधिकारी मिलिंद खोपडे यांनी हे निवेदन स्वीकारले. दरम्यान,नरेंद्र गायकवाड यांच्या पत्नी मालती गायकवाड यांनी 30 सप्टेंबर रोजी दाखल केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबियांना भविष्यात कोणताही दबाव, धमकी किंवा प्रतिशोधाला सामोरं जावं लागू नये, यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई आणि सुरक्षेची मागणी करण्यात आली आहे.

या प्रकरणाच्या निषेधार्थ आरपीआय पक्षाचे कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे, कार्याध्यक्ष राहुल डाळींबकर आणि संघटक रविंद्र ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली आरपीआयचे तालुकाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले. गायकवाड यांच्यावर झालेली कथित शाईफेक ही पक्षाच्या नेतृत्वावरील हल्ला असल्याचा आरोप प्रकाश मोरे यांनी केला, तर संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे, कार्याध्यक्ष राहुल डाळींबकर व अन्य पदाधिकारी यांनी केली. यावेळी रायगड जिल्ह्यातील आरपीआयचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version