फूटपाथधारकांची पर्यायी व्यवस्था; शेकापच्या आंदोलनाला यश

| गडचिरोली | प्रतिनिधी |
फूटपाथधारकांना पर्यायी जागा आणि व्यवस्था केल्याशिवाय नगर परिषद अंतर्गत सुरु केलेली अतिक्रमण हटावची कारवाई करण्यात येऊ नये यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या आंदोलनाला मंगळवारी मोठे यश मिळाले आहे. नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी आणि फूटपाथधारकांचे प्रमुख नेतृत्व यांच्यात झालेल्या चर्चेनंतर 300 फूटपाथधारकांना पर्यायी जागा, 287 फूटपाथधारकांचे हॉकर झोनमध्ये सामावून घेणे, कारगिल चौकात बांधकाम केलेले 81 गाळे फूटपाथधारकांनाच देण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात यावा, या मागण्या नगर परिषद प्रशासनाने मान्य केल्या.

फूटपाथधारकांच्या वतीने शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, शामसुंदर उराडे, देवेंद्र चिमनकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. अमोल मारकवार, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, मिलिंद बांबोडे, प्रहारचे निखिल धार्मिक, वंचित आघाडीचे नेते बाळू टेंभुर्णे, फुटपाथ संघटनेचे नंदकिशोर भैसारे, नवीन गडकरी, सोमनानी यांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी विशाल वाघ यांच्याशी फूटपाथधारकांच्या मागण्यांसाठी वाटाघाटी करण्यात आल्या.
दरम्यान, आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी नगर परिषदेला भेट देऊन फूटपाथधारकांना पर्यायी जागेची व्यवस्था होईपर्यंत अतिक्रमण हटाव कारवाई स्थगित करण्याची मागणी समर्थन देऊन तोडगा काढण्यासाठी मुख्याधिकारी विशाल वाघ यांना सांगितले. त्यानंतर मुख्याधिकारी विशाल वाघ, आ. धर्मरावबाबा आत्राम, शेकाप नेते रामदास जराते आणि शिष्टमंडळाने शेकडो फूटपाथधारकांसमोर येऊन आजच्या चर्चेतून गडचिरोली शहरातील फूटपाथधारकांना येत्या आठवडाभरात पर्यायी जागेची व्यवस्था होईपर्यंत अतिक्रमण हटाव कारवाई थांबविण्यात येत असल्याचे व बैठकीतील निर्णय कळविण्यात आले. आजच्या चर्चेतून गडचिरोली शहरातील फूटपाथधारकांच्या जागेचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी पहिल्यांदाच मोठा प्रयत्न होत असल्याचे सांगून फूटपाथधारकांनी समाधान व्यक्त केले.

Exit mobile version