घरत दाम्पत्यांनी साकारला गाळ काढण्याचा देखावा; दिवी पारंगीत सजावट पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
| खास प्रतिनिधी | रायगड |
गणेशोत्सवामध्ये खासगी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बाप्पासाठी आकर्षक आरास, सजावट करतात. काही ठिकाणी सामाजिक आशय असणारे संदेश देण्याचा प्रयत्न असतो. अशीच एक भन्नाट शक्कल अलिबाग तालुक्यातील दिवी-पारंगी येथील भारत घरत आणि सुप्रिया घरत या दाम्पत्याने लढवली आहे. उमटे धरणातील गाळ काढण्याच्या संघर्षाचा प्रवास त्यांनी साकारलेल्या चलचित्र देखाव्यातून मांडला आहे. याबाबत तालुकाभर याच देखव्याची चर्चा असून, मोठ्या संख्येने भाविक बाप्पाच्या दर्शनाबरोबरच देखावा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.
अलिबाग तालुक्यात रामराज परिसरामध्ये उमटे धरण आहे. 1978 साली या धरणाची निर्मिती करण्यात आली होती. पावसाळ्यात या धरणामध्ये पाऊस पडल्यानंतर ते धरण तुडुंब भरते. या पाण्यावर परिसरातील 47 गावे आणि 33 आदिवासी वाड्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. सध्या या धरणाची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे. धरणाच्या भिंतीला ठिकठिकाणी भगदाड पडले आहे. तसेच फिल्टर प्लाँट बंद पडला आहे. धरणात गाळ साचल्याने पाण्याच्या साठ्यात कमालीची घट झाली होती. 2017 सालापासून धरणातील गाळ काढण्यासाठी सरकारी यंत्रणांबरोबर पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, सरकारी यंत्रणेने नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला फाट्यावर मारले.
परिसरातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटवा यासाठी चिंचोटीचे अॅड. राकेश पाटील यांनी धरण क्षेत्रातील तरुणांची मोट बांधली. त्यांनी उमटे धरण संघर्ष ग्रुपची निर्मिती केली. त्यानंतर अलिबागमधील पत्रकारांच्या मदतीने जिल्हा प्रशासनावर दबाव आणला. प्रशासनाने धरणातील गाळ काढण्याला परवानगी दिली. यासाठी समाजातून मदतीचे हात पुढे आले. अलिबागमधील शेकापचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, नृपाल पाटील यांनी तातडीने जेसीबी, पोकलेन आणि डंपरची विनामूल्य सोय केली. सुरुवातीला काही राजकीय पुढारी पुढे आले; पण कामाचा उरक पाहता त्यांनी त्यातून माघार घेतली. पण प्रशांत नाईक, चित्रलेखा पाटील आणि नृपाल पाटील यांनी शेवटपर्यंत माघार घेतली नाही. प्रशासनाने दिलेल्या तारखेपर्यंत गाळ काढण्याचे शिवधनुष्य त्यांनी लिलया पेलले. त्यामुळे यंदाच्या पावसाच्या हंगामामध्ये लाखो लीटर पाण्याचा अधिकचा साठा धरणामध्ये झाला. त्यामुळे नागरिकांनी धन्यवाद दिले होते. हाच प्रवास घरत दाम्पत्यांनी आपल्या सजावटीमध्ये साकारला आहे.
शेकापचे योगदान मोलाचे
तरुणांनी केलेला संघर्ष प्रत्येकाच्या मनात रुजावा आणि त्यातून समाजाला प्रेरणा मिळावी, हा त्यांचा उद्देश असल्याचे अॅड. राकेश पाटील यांनी सांगितले. अलिबागचे शेकापचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, नृपाल पाटील यांनी दिलेले योगदान न विसरता येणार आहे. उमटे धरण परिसरातील सर्व ग्रामस्थ आम्ही त्यांचे ऋणी आहोत, असेही अॅड. पाटील यांनी स्पष्ट केले.