ओव्हरलोड वाहतूक अपघाताला निमंत्रण

। पाताळगंगा । प्रतिनिधी ।

रस्ते तेथे वाहतुक ठरलेली आहेच. मात्र, अनेक वेळा वाजवीपेक्षा जास्त माल वाहनात लोड केल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच, निर्देशित ठिकाणी नियोजित वेळेवर पोहचण्यासाठी वाहनांचा वेग वाढविला जात आहे. यामध्ये औद्योगिक माल, शेतातील पेंढा किंवा भाताचा तुस हे मोठ्या प्रमाणात लोड केले जाते. काही वेळा यावरील वाहनचालक अतिवेगाने ओव्हरटेकदेखील करत असतात. परिणामी या ओव्हरलोड वाहनांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता प्रवासी वर्गाकडून वर्तवली जात आहे.

दिवसेंदिवस ओव्हरलोड वाहनांच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. काही वेळा ओव्हरलोड माल वाहनांत भरल्यामुळे रस्त्यावर धावत असताना ते वाहन एका बाजुला झुकल्यासारखे वाटत असते. यामुळे या वाहनातला माल खाली पडतो की काय किंवा वाहनच पटली होते की काय, अशी भीती अशा वाहनांच्या बाजूने जाणार्‍या छोट्या वाहनचालकांच्या मनात निर्माण होत असते. तसेच, अपघात झाल्यास याला जबाबदार कोण? असाही सवाल प्रवासी वर्गातून होत आहे. परिणामी दुचाकी व कारचालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. अशा वाहनांना आळा घालण्यासाठी रस्त्यावर अनेक ठिकाणी सुचना फलक लावण्यात आलेली आहेत. या फलकांत ‘वेगाने वाहन चालवू नका, अपघाताला निमणंत्र देऊ नका’ अशा प्रकारचे ठळक व मोठ्या अक्षरांत मजकूर लिहीलेले असतात. मात्र, कोणीही ते गांभीर्याने घेत नाही. याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे.

याबाबत प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत. यामुळे तालुक्यासारख्या गजबजलेल्या ठिकाणी ओव्हारलोड वाहतुकीमुळे प्रवासी वर्ग, शाळकरी मुले, वयोवृद्ध, अपंग या सर्वांसाठी धोका निर्माण होत आहे. त्यामुळे, या ओव्हर लोड वाहतुकीला लगाम केव्हा लागणार, हा मोठा प्रश्‍न सध्या निर्माण होत आहे.

Exit mobile version