दोन चिमुरडींवर लैंगीक अत्याचार; आठ तास रेल्वे रुळावर आंदोलन, पोलीसांनी केला लाठीमार
| मुंबई | प्रतिनिधी |
बदलापूर येथील एका नामांकित शाळेत काम करणार्या एका सफाई कर्मचार्याने दोन चिमुकल्या मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घडनेने महाराष्ट्र हादरुन गेला आहे. त्यानंतर बदलापूरमधलं वातावरण चांगलंच तणावपूर्ण झालं. नराधमाला फाशी द्या अशी मागणी करत बदलापूरमध्ये नागरिकांनी तब्बल आठ तास रेल रोको केला. तसंच शहरभर आंदोलन केले. आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. पोलीसांकडून आंदोलकांवर लाठीमार करण्यात आल्याने आंदोलकांकडून देखील परत दगडफेक करण्यात आल्याने वातावरण चिघळले होते.
दरम्यान, या प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्व प्रकरण जलदगती न्यायालयात चालवले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठीत केली. तसंच आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा होईल असे आश्वासनही दिलं आहे. पोलीसांनी गुन्ह्यातील आरोपीला अटक केली असून शाळेच्या मुख्याध्यापिका, तसेच शाळेतील दोन मावशी यांनाही निलंबीत केले आहे. सकाळपासूनच घटनेच्या निषेधार्थ आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्टेशनवर ठिय्या दिला होता. पोलीस आंदोलकांना समजावून सांगत होते, मात्र आंदोलक काही केल्या ऐकायला तयार नव्हते. आंदोलक रेल्वे ट्रॅकवरून उठत नसल्याचे पाहून पोलिस काही प्रमाणात आक्रमक झाले. त्याचवेळी आंदोलकांनी देखील रौद्र रुप धारण करून पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. या प्रकरणाची दखल बालहक्क आयोगाने घेतली आहे.
तुम्हाला जे हवं आहे तेच होणार कृपया आंदोलन थांबवा, अशी विनंती मंत्री गिरीश महाजनांकडून आंदोलकांना करण्यात आली आहे. कोणीही कायदा हातात घेऊ नका, अशी विनंती मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून करण्यात आली आहे. दरम्यान, अंबरनाथ आणि कर्जत दरम्यानच्या दोन्ही मार्गांवरील वाहतूक बंद असल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. तर काही एक्स्प्रेस ट्रेनचे मार्ग वळवण्यात आले आहेत.
नेमकी घटना काय?
1 ऑगस्टला 24 वर्षीय आरोपीची शाळेत नेमणूक झाली. त्याच्यावर लहान मुलींना वॉशरूमला नेण्याची जबाबदारी देण्यात आली होती. अल्पवयीन मुलींसोबत 12 आणि 13 ऑगस्टला घृणास्पद कृत्य घडल्याचं एका मुलीने सांगितलं. गुरूवार 14 ऑगस्ट रोजी पीडित 4 वर्षीय दोन मुलींपैकी एकीने तिच्या आजोबांकडे तिने आपल्या प्रायवेट पार्टजवळ त्रास होत असल्याचं सांगितलं तेच तिने तिच्या आईकडेही सांगितलं. घाबरलेल्या पालकांनी दुसर्या पीडित मुलीच्या पालकांशी संपर्क साधला त्यांनीही आपल्या मुलीनेही शाळेत जाण्यास नकार देत असल्याचं सांगितलं ज्यातून पुढे तिच्यासोबत असंच काहीतरी घडल्याची शंका व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी एका खासगी डॉक्टरच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी केली असता डॉक्टरने दोन्ही मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाला असल्याचं सांगितलं. पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलींच्या पालकांना तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आलं होतं. पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तसेच बदलापूर पोलीस ठाण्यात दोन नवीन पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली.
विशाखा समिती स्थापन होणार
बदलापूरच्या कुळगाव येथील शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात बदलापूरात उद्रेक उसळल्यावर सरकारला जाग आली आहे. आता कॉर्पोरेट कार्यालयांच्या धर्तीवर सर्व शाळांमध्येही विशाखा समिती स्थापन होणार आहे. यात नववी-दहावीच्या विद्यार्थिनी प्रतिनिधी असतील, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली.