। पनवेल । प्रतिनिधी ।
शेकापतर्फे पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात 3 सप्टेंबर रोजी नवनियुक्त पदाधिकार्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी ज्येष्ठ नेते, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण घरत, पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ पाटील, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, तालुका चिटणीस राजेश केणी, जि.प. सदस्य विलास फडके, रामेश्वर आंग्रे, नगरसेवक अरविंद म्हात्रे, विष्णू जोशी, ज्ञानेश्वर पाटील,पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवेंद्र मढवी, महिला आघाडीच्या अनुराधा ठोकळ, प्रीती जॉर्ज-म्हात्रे, सुरेखा मोहोकर, सारिका भगत यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी आ. बाळाराम पाटील म्हणाले कि, शेकापने सदैव अन्याय आणि अत्याचार विरोधात संघर्ष करून जनतेला न्याय दिला आहे. काही लोक वैयक्तिक स्वार्थासाठी पक्ष सोडून गेले. मात्र कार्यकर्ता आजही शेकापसोबत आहे. पक्षाचे नेते माजी आ. विवेक पाटील लवकरच आपल्यासोबत कार्यरत होतील. त्यांच्या अस्तित्वामुळे पक्षाला गतवैभव प्राप्त होईल. प्रस्तावित नैना प्रकल्प, मुंबई महाऊर्जा प्रकल्प, विरार अलिबाग कॉरिडॉर प्रकल्प, पनवेल महानगरपालिकेने पूर्वलक्षी प्रभावाने लादलेला मालमत्ता कर, नियोजन शून्य अशा प्रकारचा विकास आराखडा या विरोधात महाविकास आघाडीच्या सोबतीने भविष्यात जनतेला सोबत घेऊन लढा उभारणार असल्याचे प्रतिपादन बाळाराम पाटील यांनी केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त केले. या मेळाव्यात पंचायत समिती, गाव निहाय चिटणीसांची नियुक्ती, पुरोगामी युवक संघटना, लाल ब्रिगेड संघटना, पंचायत समिती आणि गावनिहाय महिला अध्यक्षांची नियुक्ती जाहीर करण्यात येऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या नवनियुक्त पदाधिकार्यांच्या नियुक्तीमुळे शेकापला नवसंजीवनी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.