चौघांविरोधात गुन्हा
| पोलादपूर | प्रतिनिधी |
तालुक्यातील कातळी भोगाव गावाच्या हद्दीत भुयारी मार्गाच्या कामासाठी असलेल्या शिंदे डेव्हलपर्सच्या कार्यालयातील कॅन्टीनमध्ये दारू पिणाऱ्या काही जणांना बाटल्या फेकू नका असे सांगितल्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीप्रकरणी चौघांविरोधात पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 11 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे साडेआठ वाजण्याच्या सुमारास भोगाव येथील शिंदे डेव्हलपर्सच्या कार्यालयाच्या कॅन्टीनमध्ये अनुज कुमार यादव आणि दशरथ शिवाजी डांगे (दोघेही रा. भोगाव, ता. पोलादपूर) हे पाणी आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे सागर बाबाजी घाडगे (रा. पोलादपूर), केतन हरीश घाडगे (रा. महाबळेश्वर), प्रतीक कांबळे आणि प्रतीक घाडगे (दोघेही रा. महाबळेश्वर) हे चौघे दारू पित बसले होते. दरम्यान, बाटल्या फेकू नका, काचा लागतील असे सांगितल्याने आरोपींना राग आला. त्यांनी “तू कोण रे?” असा सवाल करत अनुज यादव आणि दशरथ डांगे यांना हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
घटनास्थळी आलेले फिर्यादी सुशील वाल्मिक शिवणकर यांनी आरोपींना मारहाण का केली असा जाब विचारला असता आरोपींनी त्यांनाही प्लास्टिकच्या काठीने, हाताबुक्क्यांनी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ व दमदाटी केल्याचे सांगण्यात आले आहे. या झटापटीदरम्यान फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हरवली असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पवार करत आहेत.
