‘केएमसी’ला बी + श्रेणीसह मूल्यांकन

शैक्षणिक व संशोधन कार्यात उत्तम योगदान
। खोपोली । प्रतिनिधी ।
खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या के.एम.सी. अर्थात खोपोली मुन्सिपल कौन्सिल कॉलेजला ‘राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद’ (नॅक) कडून तिसर्‍यांदा ‘बी प्लस’ (B +) ही ग्रेड मिळाली आहे.

सन 2016-17 ते 2021-22 या पाच वर्षाच्या कालावधीतील शैक्षणिक, संशोधनपर व सर्वांगीण प्रगतीचा अहवाल महाविद्यालयांने संस्थेला जमा केला होता. त्याच्या आधारे ‘नॅक’ तज्ज्ञ समितीने नुकतीच महाविद्यालयाला अभ्यासपूर्ण अशी भेट दिली आणि महाविद्यालयाच्या एकूण प्रगतीचे मूल्यमापन करत पुनर्मूल्यांकनांसह उत्तम श्रेणी दिली आहे. ज्यात महाविद्यालयाच्या शैक्षणिक, संशोधनपर व विद्यार्थी विकासाच्या दृष्टीने करत असलेल्या कार्याची नोंद ‘नॅक’ने घेतली आहे. आतापर्यंत महाविद्यालयाचे दोन वेळा क्रिडीएशन झालेले होते.

कॉलेजच्या या उत्तुंग कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम, उपाध्यक्ष संजय पाटील, कार्यवाह किशोर पाटील, माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ सदस्य दत्ताजीराव मसुरकर, महाविद्यालयाचे उपाध्यक्ष, राजेश अभाणी, विविध शालेय समित्यांचे अध्यक्ष तथा कार्यकारणी आजी व माजी सदस्य, यांनी प्राचार्य, डॉ. प्रताप पाटील, डॉ. महेश खानविलकर, प्रा. राजेंद्र कोकणे, समन्वयक डॉ. दीपक गायकवाड, सर्व शाखा व विभाग प्रमुख, प्राध्यापक-प्राध्यापिका, शिक्षकेतर सेवकवृंद व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे या कामगिरीबद्दल हार्दिक अभिनंदन केले आहे. महाविद्यालयाच्या या कार्यकर्तृत्वाबद्दल खोपोलीतील नागरिक, पालक, पत्रकार, माजी विद्यार्थी सर्वच स्तरातून महाविद्यालयाचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

‘नॅक’कडून महाविद्यालयाला मिळालेली ही ग्रेड नक्कीच गौरवास्पद आहे. संस्थेतील माझे सर्व सहकारी व महाविद्यालयातील सर्वच घटकांच्या एकत्रित प्रयत्नातून हे शक्य झाले आहे. त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो आणि भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.

– संतोष जंगम, अध्यक्ष, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ
Exit mobile version