| पेण | प्रतिनिधी |
अरुंद रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंग केलेला टेम्पो काढण्यासाठी सांगितल्याचा राग ठेवून चक्क सहाय्यक पोलीस निरीक्षकालाच धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याची घटना पेण तालुक्यातील जोहे गावात घडली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील जोहे गावात गणपती मूर्ती घेऊन जाण्यासाठी मुंबई, पुणेसह राज्यातुन अनेक व्यापारी येत असतात त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असते. जोहे गावातील आरोपी नवनाथ प्रल्हाद घरत ( वय 34 ) रा.जोहे याने आपल्या ताब्यातील ( क्र. MH 06 BW 3959) क्रमांकाचा आयशर टेम्पो अरुंद रस्त्यावर लावला होता. दादर सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांनी टेम्पो रस्त्यातून बाजूला घेण्यास सांगितले. या गोष्टीचा राग येऊन टेम्पो चालक नवनाथ घरत याने गोविंद पाटील यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. या घटनेनंतर आरोपी टेम्पो घेऊन पळून गेला होता.
या प्रकरणी दादर सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फरार असलेल्या आरोपीला दादर सागरी पोलिसांनी अटक करून पेण न्यायालयात हजर केले असता 27 जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.