। नेरळ । प्रतिनिधी ।
मुंबई आणि पुण्यातून येणारे पर्यटक आणि नाशिक भागातून येणारी अवजड वाहने यांच्यामुळे कर्जत येथील चारफाटा वाहतूक कोंडीचा केंद्रबिंदू बनला आहे. चारफाटा येथून नेरळ-माथेरान-कल्याण, कर्जत-मुरबाड-शहापूर, कर्जत स्टेशन तसेच, चौक-मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग असे रस्ते निर्माण होतात. त्यामुळे वाहतूक कोंडीचा केंद्रबिंदू राहणार्या चारफाटा येथील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना कर्जमधील सुनील गोगटे यांनी कर्जत बाह्यवळण रस्त्याच्या मागणीचे निवेदन दिले आहे.
हा रस्ता राज्य रस्ते विकास महामंडळाकडे असून या विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पाटील यांच्याकडे गोगटे यांनी सतत पाठपुरवा केला होता. त्यातून कार्यकारी अभियंता कार्यालयाने कर्जत बायपास रस्त्याचे अंदाजपत्रक तयार केले आहे. यावेळी, केंद्रीय रस्ते विकास वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कर्जत बाह्यवळणाची आवश्यता असल्यामुळे लवकरच मंजुरी मिळेल, असे आश्वासन दिले आहे.