। रेवदंडा । प्रतिनिधी ।
मुलींवरील वाढत्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी रायगड जिल्हा परिषद आणि राजिप महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने ग्रामीण भागातील मुलींना स्वः संरक्षण व त्याच्या शारिरिक विकासासाठी कराटे प्रशिक्षणाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. यावेळी, रायगड जिल्हा कराटे असो.च्या प्रशिक्षकांच्या माध्यमातून मुलींना कराटे प्रशिक्षणाला प्रारंभ करण्यात आला.
सध्याची सामाजिक परिस्थितीचे अवलोकन करताना मुली व महिलांच्या अत्याचारात वाढ होत असल्याचे दिसत आहे. सध्यस्थितीत विविध क्षेत्रात महिला कार्यरत असल्यातरी त्यांचे शोषण करणार्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे मुलींवरील वाढत्या अत्याचाराला आळा बसविण्यासाठी रायगड जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागच्यावतीने ग्रामीण विभागातील मुलींना स्वसंरक्षण व शारिरिक विकासासाठी कराटे प्रशिक्षण आयोजित केले जात आहे. आतापर्यंत जिल्हातील सर्व तालुक्यातून 1 हजार 300 विद्यार्थीनींनी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदविला आहे.
हे प्रशिक्षण पुर्ण करण्यासाठी रायगड जिल्हा कराटे असो.च्या संस्थेच्या प्रक्षिकांची निवड करण्यात आली आहे. यासाठी रायगड जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी व राजिप महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभत असल्याचे रायगड जिल्हा कराटे असो.चे मुख्यः प्रशिक्षक नंदकुमार वरसोलकर यांनी सांगितले आहे.