| अलिबाग | प्रतिनिधी |
अवधूत पाटील पुरस्कृत, अवधूत पाटील मित्रमंडळ व कुरूळ क्रिकेट मंडळ यांच्यावतीने नाईट टेनिस क्रिकेट सामन्यांचे आयोजन दि.27 ते 29 मार्च या कालावधीत कुरूळ येथील आझाद मैदानात करण्यात आले. या स्पर्धेत 8 ग्रामीण संघ, 16 गाव टू गाव संघ आणि 8 खुल्या संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी (दि.27) मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला.
या स्पर्धेचे उद्घाटन शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी शेकापचे ज्येष्ठ पदाधिकारी, माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच विविध कार्यकर्ते, महिला व युवा कार्यकर्ते यांच्यासह कुरुळ ग्रामस्थ आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि.28) रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील व युवराज पाटील यांनी विशेष उपस्थिती दर्शवून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. तिन दिवस सुरू असणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (दि.29) खेळवला गेला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवणाऱ्या संघाला 1 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक पटकवणाऱ्या संघाला 80 हजार रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक, तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांक पटकवणाऱ्या संघाला प्रत्येकी 40 हजार रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अवधुत पाटील यांच्यासह मित्रमंडळातील सदस्यांनी अथक प्रयत्न घेतले.










