। जेएनपीटी । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना तातडीने उपचार मिळावा, यासाठी शासनाच्या वतीने सिडको ट्रेनिंग सेंटर, बोकडविरा येथे उभारण्यात आलेल्या समर्पित कोव्हिड आरोग्य केंद्राला चक्क प्रशासनाने टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे सिडकोने करोडो रुपये खर्चून आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणारे समर्पित कोविड आरोग्य केंद्र आज धुळखात पडले आहे.
औद्योगिकदृष्ट्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करु पाहणार्या उरण तालुक्यात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असणारे रुग्णालय नसल्याने अनेकांना कोरोनाच्या संकटात उपचाराअभावी आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांना तातडीने उपचार मिळावा, यासाठी शासनाने उरण तालुक्यात सोयीसुविधा उपलब्ध असणारे रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी माजी आमदार मनोहर भोईर, उरण सामाजिक संस्थेचे संतोष पवार, सुधाकर पाटील, कामगार नेते भुषण पाटील यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने लावून धरली होती. त्या मागणीची दखल शासनाने घेऊन सिडको ट्रेनिंग सेंटर, बोकडविरा येथे समर्पित कोव्हिड आरोग्य केंद्राची उभारणी सिडको, स्थानिक प्रकल्प व्यवस्थापन यांनी करोडो रुपये खर्चून सामाजिक संस्था, स्थानिक डॉक्टरांच्या माध्यमातून केली.
त्यामुळे तालुक्यातील अनेक कोरोना बाधित रुग्णांवर तातडीने उपचार होऊ शकले. वेळेवर मिळणार्या उपचारांमुळे कोरोना बाधित रुग्णांना जीवदान मिळाले. परंतु कोरोनाच्या संकटात सापडलेल्या उरणकरांना आरोग्याची संजीवनी देऊ पाहणार्या समर्पित कोविड आरोग्य केंद्राला प्रशासनाने टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. ही एक खेदाची बाब आहे.
शासनाने उरणकरांच्या आरोग्यासाठी सिडकोच्या माध्यमातून मंजूर केलेल्या 100 खाटांच्या रुग्णालयाचे घोंगडे आजही भिजत पडले आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने सोयीसुविधांने उपयुक्त असणारे समर्पित कोव्हिड आरोग्य केंद्राचे रुग्णालय जैसे थे स्थितीत सुरु ठेवणे काळाची गरज आहे. अन्यथा करोडो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या समर्पित कोव्हिड आरोग्य केंद्रातील आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणार्या अत्याधुनिक साहित्याना गंज चढून सदर साहित्य निकामी होईल, अशी भिंती चक्क डॉक्टर आणि सर्व सामान्य जनतेत व्यक्त केली जात आहे.
