आव्हाडांकडून मनुस्मृतीचे दहन

सरकारच्या धोरणाविरोधात संताप

| महाड | प्रतिनिधी |

नव्या शैक्षणिक आराखड्यातील मनुस्मृतीच्या उल्लेखाला विरोध करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये मनुस्मृती दहन आंदोलन केले. मनुस्मृतीमध्ये शूद्र व स्त्रीबाबत चुकीच्या पद्धतीने लिखाण केले. त्या संदर्भाला पुन्हा नव्याने जागृत करण्याचे काम राज्य सरकार पाठ्यपुस्तकातून करत आहे. पुरोगामी देशाला पाच हजार वर्षे मागे नेण्याचे काम सरकार आहे, अशी टीका आव्हाड यांनी सरकारवर केली.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, ‘एससीईआरटी’ने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात ‘मनुस्मृती’मधील दोन श्‍लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या आहेत. अनेक पुरोगामी संघटना आणि राजकीय पक्षांनी राज्य सरकारच्या या प्रस्तावास विरोध दर्शवला आहे. विरोधकांनी राज्य सरकारविरोधात टीकेची झोड उठवली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही याविरोधात आक्रमक भूमिका घेत महाड येथील चवदार तळ्यावर जाऊन मनुस्मृती ग्रंथाचे दहन केले.

1927 साली महाडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले होते, त्याचठिकाणी बुधवारी जितेंद्र आव्हाड यांनी मनस्मृतीचे दहन केले. मनुस्मृतीतील दोन श्‍लोक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केले जात आहेत. हळूहळू मनुस्मृतीचा समावेश शालेय अभ्यासक्रमात होईल, असे आव्हाड यावेळी म्हणाले. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मिलिंद टिपणीस यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version