| महाड | जुनेद तांबोळी |
बिरवाडी ढालकाठी मार्गावर दुचाकीचा अपघात होऊन त्यात दोन शाळकरी मुलाचा मृत्यु झाला. तर एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे. (शनिवारी) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ढालकाठी पुलानजिक हा अपघात झाला. जखमी मुलाला मुंबई येथे हलविण्यात आले. महामार्गावर गाडी चालवत असताना शक्यतो वेगावर नियंत्रण असणे ही फार मोठी गरज आहे. गाडी चालवत असताना हेल्मेट पण लावला पाहीजे आज हेल्मेट जर घातला असता तर आज दोन मुलांना आपला जीव गमवावा लागला नसता. कित्येक शाळेत जाणारी मुले आज दुचाकी चा मोठ्या प्रमाणात वापर करतात. पालकवर्गानी जोपर्यंत मुलगा 18 वर्षाचा होत नाही आणी लायसेन्स मिळत नाही तोपर्यंत आपल्या मुलांना गाडी देऊ नये. अन्यथा असे अपघात आपल्या मुलांकडुन घडत राहतील आणी त्यात पालकांना नाहक त्रास सहन करावा लागेल. दुचाकी चालवताना सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
रस्त्यावरील अपघात प्रामुख्याने निष्काळजीपणामुळे आणि बेभान वर्तनामुळे होताना आढळतात. या व्यक्ती स्वतःबरोबरच इतर व्यक्ती तसेच समाजातील इतर घटकांवरही दुष्परिणाम करताना दिसतात. अतिवेगाने वाहने चालवणे, मद्यपान सेवन करून वाहने चालवणे, विना हेल्मेट प्रवास करणे, सिट बेल्ट न लावणे, खासगी वाहतूक करताना प्रवाशांची काळजी न घेणे, वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसते. त्यावर वाहतूक पोलिसांकडून कडक कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून नागरिकांमध्ये वेळोवेळी वाहतुकीच्या नियमांविषयी जनजागृती केली जाते. यंदा राज्यातील ठाणे पोलिसांनी तरुणाईला साद घालत ‘नियम पाळा, अपघात टाळा ’ हा उपक्रम सुरू केला होता. त्या धर्तीवर ठिकठिकाणी असा उपक्रम राबविणे गरजेचे आहे. समाजमाध्यमांच्या मदतीने वाहतुकीचा रोज एक नियम समजावून सांगण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असून तरुण वर्गाला केंद्रस्थानी ठेवले गेले पाहिजे. भरधाव गाडी चालविणे, दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर न करणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे यांसारखे नियम मोडणाऱ्यांमध्ये तरुणवर्गाचा मोठय़ा प्रमाणावर समावेश असतो. यामुळे होणाऱ्या अपघातांमध्ये काहींना आपला जीव गमवावा लागतो तर काहींना कायमचे अपंगत्व येते.
नागरिकांनी वाहतूक नियमांविषयी सजगता बाळगावी आणि नियम मोडून आपला जीव धोक्यात घालू नये. या उद्देशाने वाहतूक पोलीस सह पोलिसांनी फेसबुक पेज, ट्विटर आणि इन्स्टाग्राम पेज या तिन्ही समाजमाध्यमांतून वाहतुकीचा रोज एक नियम छायाचित्रांसह सविस्तररीत्या सादर करणे गरजेचे आहे. हेल्मेटचा वापर करणे, वेगमर्यादा, दुचाकीवरून तिघांनी प्रवास करू नये, शाळा आणि रुग्णालयांजवळ विनाकारण भोंगे वाजवू नये, वाहनांमध्ये योग्य अंतर ठेवणे यांसारख्या अनेक मूलभूत मात्र महत्त्वाच्या नियमांविषयी वाहतूक पोलिसांमार्फत समाजमाध्यमांद्वारे माहिती देण्यात येणे क्रमप्राप्त बनले आहे.
