। तळा । वार्ताहर ।
तळा बसस्थानकातील मुतारीची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून मुतारी तुंबलेल्या अवस्थेत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. बसस्थानकशेजारी असलेल्या स्वच्छता गृहाबाबत प्रवाशांच्या वारंवार तक्रारी येऊनही एसटी महामंडळाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पुरुषांची मुतारी तुंबल्याने नाईलाजाने पुरुष प्रवासी महिलांसाठी असलेल्या मुतारीचा वापर करतात. वेळच्यावेळी महिलांच्या मुतारीची देखील स्वच्छता न झाल्यामुळे तीही आता तुंबलेल्या अवस्थेत आहे. यामुळे पुरुषांसह महिला प्रवाशांचे देखील हाल होत आहेत. काहीवेळा पर्याय नसल्याने काही पुरुष प्रवासी बसस्थानक आवारातच आडोशाला लघुशंका करतात. यामुळे दिवसभर बसस्थानक परिसरात दुर्गंधी पसरलेली असते व याचा त्रास आजूबाजूला राहणारे नागरिक तसेच व्यवसाय करणार्या व्यापार्यांना सहन करावा लागतो. त्यामुळे एसटी महामंडळाने लवकरात लवकर तुंबलेल्या मुतारीची स्वच्छता करून नियमित स्वच्छता गृहाची सफाई होईल याकडे लक्ष द्यावे जेणेकरून स्वच्छतागृह अभावी नागरिकांचे होणारे हाल थांबतील. अशी मागणी येथील प्रवासी, नागरिक व व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.