बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना
| रायगड | खास प्रतिनिधी |
ग्रामीण भागाचा कारभार चालणार्या ग्रामपंचायतींची कार्यालये आता कात टाकणार आहेत. राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही, अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यातील 26 ग्रामपंचायतींना स्वत:चे ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी पाच कोटी 55 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी दिली.
रायगड जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वतःचे कार्यालय नाही अशा 26 ग्रामपंचायतींना स्वत:चे कार्यालय बांधण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत निधी मिळावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने ग्रामविकास विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून, ग्रामपंचायतींना इमारत बांधण्यासाठी पाच कोटी 55 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या सर्व ग्रामपंचायत इमारतींचे हरित ग्रामपंचायत म्हणून बांधकाम करण्यात यावे, तसेच ग्रामपंचायतींना सोलरच्या माध्यमातून वीजपुरवठा उपलब्ध केला जावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत दोन हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या, परंतु स्वतंत्र ग्रामपंचायत नसलेल्या ग्रामपंचायतींना इमारत बांधण्यासाठी 25 लाख निधी देण्यात येतो. अशा जिल्ह्यातील सात ग्रामपंचायतींना एक कोटी 75 लाखांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर, दोन हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना इमारत बांधण्यासाठी 20 लाख निधी देण्यात येतो. अशा जिल्ह्यातील 19 ग्रामपंचायतींना तीन कोटी 80 लाख निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
तालुकानिहाय निधी मंजूर झालेल्या ग्रामपंचायती
अलिबाग : वैजाली
पेण : काळेश्री, कोपर
पनवेल : जांभिवली
उरण : नागाव, म्हातवली, नवघर
कर्जत : वदप, जिते, अंभेरपाडा
खालापूर : आसरे, वरोसे, लोधिवली, चौक
माणगाव : हरकोल, टेंमपाले
महाड : शेले, आसणपोई
म्हसळा : निगडी
पोलादपूर: पळचिल, ओंबळी, महालुंगे, महालगुर
श्रीवर्धन : नागलोली, सायगाव
मुरुड : आगरदांडा