नवेदर बेली पुलावरून अवजड वाहनांना बंदी

लोखंडी बॅरिअर्स उभारून सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यवाही

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील नवेदर येथील धोकादायक ठरत असलेल्या बेली पुलावरून अवजड वाहनांच्या वाहतुकीस अखेर बंदी घालण्यात आली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना लोखंडी बॅरिअर्स उभारण्यात आल्याने आता केवळ हलक्या वाहनांनाच या पुलावरून प्रवास करता येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.



गेल्या काही दिवसांपासून या बेली पुलाची अवस्था अत्यंत जीर्ण व धोकादायक बनली होती. पुलाची वहनक्षमता कमी झाल्याने अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे मोठा अपघात होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी तसेच लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली होती.

या मागणीची दखल घेत संबंधित यंत्रणांनी पुलाची पाहणी करून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतली. त्यानुसार पुलाच्या दोन्ही टोकांना लोखंडी बॅरिअर्स बसविण्यात आले असून, त्यामुळे ट्रक, डंपर आणि इतर अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले की, पुलावरील सुरक्षिततेला प्राधान्य देत ही कार्यवाही करण्यात आली असून, पुढील तांत्रिक तपासणी व आवश्यक दुरुस्ती होईपर्यंत अवजड वाहनांना या पुलावरून प्रवेश दिला जाणार नाही. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहनही विभागाने केले आहे.

Exit mobile version