यंदा बाप्पांचा बारा दिवस मुक्काम!

हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी

। रायगड । प्रतिनिधी ।

यंदाचा गणेशोत्सव नेहमीप्रमाणे 10 किंवा 11 दिवसांचा नसून थेट 12 दिवसांचा असणार आहे. दि.14 सप्टेंबर रोजी बाप्पाचं आगमन होत असून, यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्याने तसेच तिथीच्या वाढीमुळे हा बदल घडून आला आहे. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आता गणेशोत्सवाला एक महिन्याहून कमी कालावधी राहिला असून, गणेशोत्सवाची तय्यारी जोरदार सुरू आहे.

भाद्रपद शुक्ल चतुर्थीला घरोघरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते, तर सार्वजनिक गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीला करण्यात येते. चतुर्थीपासून चतुर्दशीपर्यंतच्या याच तिथी असतात, कारण सर्व सण-वार हे तारखेवर नव्हे तर तिथीवर अवलंबून असतात. त्यामुळे चतुर्थी ते चतुर्दशी या तिथींचा समूह एकूण 11 तिथींचा होतो. काही वेळा किंचित वृद्धी होते, तर काही वेळा तिथीचा क्षय होतो. त्यामुळेच कधी गणपती 10 दिवसांचे, तर कधी 11 दिवसांचे असतात. मात्र, यंदा 12 दिवस गणेशोत्सव साजरा होणार आहे. असा योग तब्बल नऊ वर्षांनंतर आला आहे. यापूर्वी सन 2017 साली गणेशोत्सव 12 दिवसांचा आला होता. सोशल मीडियावर या 12 दिवसांच्या उत्सवाबाबत अनेक तर्क-वितर्क आणि दुर्मिळ योगाच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, हा कोणताही अद्भूत किंवा दुर्मिळ योग नसून, केवळ तिथीच्या गणितामुळे झालेला हा बदल आहे, असा स्पष्ट खुलासा पंचांगकर्त्यांनी केला आहे. येत्या 14 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाची जोरदार तयारी सुरू आहे. या 12 दिवसांच्या उत्सवाबाबत सोशल मीडियावर अनेक उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी असल्याने त्याच दिवशी गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे.

तिथीच्या गणितामुळे बदल
यंदा 14 सप्टेंबर रोजी भाद्रपद शुक्ल तृतीयेच्या दिवशी म्हणजेच हरतालिकेच्या दिवशीच गणपती बाप्पांचे आगमन होत आहे. त्यामुळे तृतीयेपासूनच यंदा ही गणना करावी लागते. तृतीया ते अनंत चतुर्दशीपर्यंतचे दिवस मोजल्यास 14 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर ते तब्बल 12 दिवस होतात. हिंदू धर्मातील सर्व सण हे तिथीनुसार साजरे केले जातात. कधी तिथीचा क्षय होतो, तर कधी तिथीची वृद्धी होते. यंदा गणेश चतुर्थी ही तृतीयेच्या दिवशी येत असल्याने, तृतीया ते अनंत चतुर्दशी असे तब्बल 12 दिवस होतात.
हा दुर्मिळ योग नाही
सोशल मीडियावर हा योग अनेक वर्षांनंतर आल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात तसे काहीही नाही, हा केवळ समज आहे. तिथीची वृद्धी आणि क्षय यामागील जे लॉजिक असते, त्यानुसारच दिवसांमध्ये कमी-जास्तपणा होत असतो. त्यामुळे यंदाचा हा 12 दिवसांचा गणेशोत्सव कोणताही विशेष असा दुर्मिळ योग नाही, असे पंचागकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.
Exit mobile version