वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क
24 तासात जिल्ह्यात 317 नवीन रूग्ण
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णसंख्येत पुन्हा एकदा सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. मागील 24 तासांमध्ये तब्बल 317 नवीन कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. शिवाय, जिल्ह्यातील एकूण संख्या हजारांच्यावर गेल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रूग्ण आढळायला सुरूवात झाली. मात्र, सुरूवातीला ही संख्या खूपच कमी होती. आता मात्र पुन्हा एकदा रूग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. आजच्या घडीला एकूण 1 हजार 97 अॅक्टिव्ह रुग्ण असून, सौम्य व मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेले 13 रुग्ण कोव्हिड रुग्णालयात उपचार घेत आहेत. गेल्या 24 तासात आढळून आलेल्या नवीन रूग्णांची संख्या 317 आहे.
वाढत्या रुग्णसंख्येच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी रायगड जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क व सजग राहण्याचे तसेच स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना स्वतःची व इतरांची काळजी घावी, तसेच कोव्हिड-19 नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केले आहे. तसेच सर्व नागरिकांनी सामाजिक अंतर, मास्कचा वापर आणि सॅनिटाझरचा वापर या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
नागरिकांनी कोरोनापासून आपला बचाव करण्यासाठी कोव्हिड लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करावेत, असेही जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. तसेच 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घ्यायचे आहेत व इतर नागरिकांनी म्हणजेच 18 वर्ष व त्यावरील नागरिकांनी कोविशिल्ड किंवा कोवक्सिनचे 2 डोस पूर्ण करून घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
60 वर्ष व त्यावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांनी त्यांचा दुसरा डोस पूर्ण झाल्यानंतर 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झालेले असल्यास व त्यांना 3 महिन्यामध्ये कोविड संसर्ग झालेला नसल्यास त्यांनी प्रिकॉशनरी (बुस्टर) डोस पूर्ण करून घ्यावा. त्याचबरोबर 18 ते 59 वर्षातील नागरिकांनी प्रिकॉशनरी (बुस्टर) डोस घेण्याचा असल्यास व दुसरा डोस घेऊन 9 महिने झाले असल्यास त्यांनी खाजगी लसीकरण केंद्रावर जाऊन त्यांचे डोस पूर्ण करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.