पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी; 29,562 महिलांचे अर्ज मंजूर
| नेरळ | प्रतिनिधी |
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थींना योजनेतील दोन महिन्यांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहेत. बँकेत जमा झालेले तीन हजार रुपयांचे अनुदान काढण्यासाठी कर्जत तालुक्यातील सर्व बँकामध्ये मुख्यमंत्र्यांच्या भगिनी यांनी गर्दी केल्याचे चित्र आहे. दरम्यान, कर्जत तालुक्यात पहिल्या टप्प्यात 29,562 महिलांना अनुदानाचा पहिला हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहेत.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 14 ऑगस्टपासून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर जमा होऊ लागले आहेत. कर्जत तालुक्यात साधारण 38 ते 40 हजार महिला लाभार्थी लाडकी बहीण योजनेत पात्र होऊ शकतात. कर्जत तालुक्यात ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल झाले होते. जुलै महिन्यात त्या सर्व अर्ज यांची छाननी झाली. तालुक्यात वेगवेगळे राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि पक्ष कार्यालये यांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेण्यासाठी शिबिरे घेतली. तर शासन पातळीवर थेट अंगणवाडी सेविकांपर्यंत अर्ज भरण्याची सवलत दिल्याने मोठ्या प्रमाणावर अर्ज भरले गेले. जुलैअखेर कर्जत 30,995 अर्ज महिला लाभार्थी यांनी भरले आणि त्यातील 29,562 लाभार्थी यांचे अर्ज मंजूर झाले आहेत. उर्वरित लाभार्थ्यांचे बँक खाते हे आधार लिंक नसल्याने त्या अडचणी आल्या असल्याचे कर्जत पंचायत समितीमधील एकात्मिक बालविकास विभाग यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
14 ऑगस्टपासून कर्जत तालुक्यातील लाडकी बहीण योजनेतील पात्र महिला यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचे अनुदान येण्यास सुरुवात झाली आहे. त्याबाबत मेसेज आपल्या मोबाईल फोनवरून यायला सुरुवात झाली असून, दि. 15 ऑगस्टमुळे सुट्टी असल्याने शुक्रवारी 16 ऑगस्ट रोजी महिला बँकेतील पैसे काढण्यासाठी घराबाहेर पडल्या आहेत. बँक खात्यातील पैसे काढण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात बँकेमध्ये गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. राज्य सरकारने 1 जुलै रोजी जाहीर केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 15 ऑगस्ट रोजी बँक खात्यामध्ये जमा झाला आहे. 31 जुलैपर्यंत ज्या महिलांनी अर्ज केले होते, त्या महिलांना या योजनेचा लाभ प्राप्त झाला आहे.
दीड हजार रुपये मासिक लाभ मिळणार असून, यावेळी दोन्ही महिन्यांचा एकूण तीन हजारांचा लाभ महिलांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत. यामुळे सर्व बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी महिलांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. सोमवारी रक्षाबंधन सण असल्याने महिला नारळी पौर्णिमेचा खरेदीचा उत्साह साजरा करण्यासाठी आपल्या बँक खात्यातील पैसे काढण्यासाठी बँकेत पोहोचल्या आहेत.