सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील उल्हास नदीवर बेंडसे आणि वावे या गावांना जोडणार्या पुलावरून दरवर्षी पावसाळ्यात महापुराचे पाणी जात असते. यावर्षी पावसाळ्यात त्या पुलावरून पावसाचे पाणी गेल्यानंतर पुलावरील लोखंडी रेलिंग वाहून गेले आहेत. त्या लोखंडी रेलिंगबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, बांधकाम विभाग बेंडसे-वावे पुलाला लोखंडी रेलिंग बसवणार की नाही, असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित होत आहे.
उल्हासनदीवर वावळोली ग्रामपंचायतमधील बेंडसे आणि उमरोली ग्रामपंचायतमधील वावे या दोन गावांना जोडणारा पूल 2020 मध्ये बांधण्यात आला होता. त्यापूर्वी या भागातील लोकांना आपल्या गावी जाण्यासाठी एकतर कर्जत येथून किंवा भिवपुरी चिंचवली येथून जावे लागत होते. मात्र, सार्वजनिक बांधकामखात्याकडून वावे आणि बेंडसे या गावांना जोडणारा पूल बांधण्यात आला. परंतु, त्या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात त्या पुलावरून महापुराचे पाणी जाऊन स्थानिकांच्या घरात घुसते. त्यामुळे पुलासह नागरीकांचेदेखील मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यावर्षी त्या पुलाला लावण्यात आलेले लोखंडी रेलिंग तुटून वाहून गेले असून ते रेलिंग पुन्हा लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप कोणतीही हालचाल करण्यात आली नसल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे रात्री अपरात्री या पुलावरून प्रवास करताना अपघात होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग बेंडसे-वावे पुलाची दुरुस्ती करणार आहे की नाही, असा प्रश्न ग्रामस्थ आणि प्रवासी वर्ग उपस्थित करीत आहेत.
बांधकाम खात्याला पुलाचे लोखंडी रेलिंग महापुराच्या पाण्याने वाहून गेले आहेत याची माहिती आहे की नाही, हा देखील प्रश्न आहे. कारण बेंडसे वावे या पुलाचे पावसाळ्यात महापुराच्या पाण्याने नुकसान झाले असून त्याची माहिती घ्यायला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोणतेही अधिकारी तसेच कर्मचारी आले नाहीत. त्याचबरोबर पावसाळ्यात वाहून गेलेल्या पुलाच्या लोखंडी रेलिंगबद्दल बांधकाम खात्याने अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्याबद्दल आम्हा सर्व ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
– गणेश धारणे, स्थानिक ग्रामस्थ